नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री अमित शाह यांची उपस्थिती असलेल्या कार्यक्रमात नरेंद्र मोदी सरकारवर टीका कऱणारे उद्योगपती राहूल बजाज आता भाजपच्या निशान्यावर आले आहेत. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथून खासदार असलेले अजय मिश्रा यांनी राहुल बजाज यांच्यावर हल्लाबोल केला. मुंबईतील एका कार्यक्रमात राहुल बजाज यांनी भाजपवर टीका केली होती.
विद्यमान सरकारवर टीका करण्याची भीती वाटते. युपीएच्या काळात कोणीही कोणावर सहज टीका करू शकत होतं, असं बजाज म्हणाले होते. त्यावर मिश्रा म्हणाले की, बजाज ग्रुपच्या साखर कारखान्यांवर दहा हजार कोटींचे कर्ज आहे. अशा स्थितीत कारवाई होणार म्हटल्यावर भीती वाटणे सहाजिकच असल्याचा टोला मिश्रा यांनी बजाज यांना लगावला आहे.
एका विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू होती. त्यावेळी विरोधकांनी राहुल बजाज यांच्या वक्तव्याचा उल्लेख केला होता. यावर भाजप खासदार मिश्रा यांनी साखर कारखान्यांचा मुद्दा काढला. ते म्हणाले की, लखीमपूर माझा मतदार संघ आहे. येथे ऊस शेती मोठ्या प्रमाणात आहे. येथे 10 मोठे कारखाने असून त्यापैकी तीन कारखाने राहुल बजाज यांचे आहेत. या तीन कारखान्यांवर दोन वर्षात 10 हजार कोटींचे कर्ज झाले आहे.
दरम्यान विरोधीपक्षाने त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला. त्यानंतर ते म्हणाले मी लखीमपूरचा खासदार असून तुमच्यापेक्षा अधिक मला माहित आहे. राहुल बजाज यांचा मुलगा दर महिन्याला येथे येत असून तेच कारखान्यांचे मालक आहेत. तसेच जे चुकीच काम करतात त्यांना भीती वाटने सहाजिकच असल्याचे ते म्हणाले.