- विकास झाडेनवी दिल्ली : येत्या २६ ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ११ महिने पूर्ण होत आहेत. या निमित्ताने दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे संयुक्त किसान मोर्चाने आवाहन केले आहे. शिवाय केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी यंदा ‘काळी दिवाळी’ साजरी करू असा निश्चय शेतकऱ्यांनी केला आहे. कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या विविध सीमांवर शेतकरी आंदोलन सुरू आहे. डिसेंबर व जानेवारीमध्ये केंद्र सरकारच्या मंत्रिगटाने शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. पण त्यातून तोडगा निघाला नाही. पुढे प्रजासत्ताक दिनी काही शेतकरी लाल किल्ल्यात घुसल्यानंतर वातावरण बिघडले आणि सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. त्यामुळे आंदोलन तीव्र करण्याच्या निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणारदेशभरातील शेतकऱ्यांना कृषी कायद्याविरोधात ऑक्टोबरअखेरपर्यंत राजधानी दिल्लीच्या सीमेवर एकत्रित होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यंदाची दिवाळी आमच्यासाठी काळी असेल, असे सांगून, या निमित्ताने सरकारचे लक्ष वेधणार असल्याची माहिती संयुक्त किसान मोर्चाचे सदस्य संदीप गिड्डे-पाटील यांनी दिली. शेतकऱ्यांच्या मागण्या सरकार मान्य करीत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. निहंग शीख आंदोलकांसंबंधी संयुक्त किसान मोर्चाची भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले की, निहंग शीख हे आंदोलनाला समर्थन देणारा एक वर्ग होता. पण आम्हाला कोणताही हिंसाचार मान्य नाही. आंदोलन उधळण्याचा डाव सरकारकडून सातत्याने होत आहे.
शेतकऱ्यांची यंदा दिवाळी असेल काळी; दिल्लीच्या सीमेवर येण्याचे शेतकऱ्यांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 6:35 AM