नवी दिल्ली : देशाच्या राजधानीच्या सीमेवर पोहोचलेल्या किसान क्रांती पदयात्रेनं उग्र रुप धारण केलं आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावं यासाठी केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्याप या प्रयत्नांना यश आलेलं नाही. दिल्ली-उत्तर प्रदेशच्या सीमेवर केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी बातचीत केली. मात्र यातून कोणताही मार्ग निघालेला नाही. सरकारकडून शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार केला जाईल, असं आश्वासन राजनाथ सिंह यांनी शेतकऱ्यांना दिलं. मात्र यावरुन शेतकऱ्यांचं समाधान झालेलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरुच राहणार आहे. आज रात्रभर हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर थांबणार आहेत. सरकारनं दिलेलं आश्वासन शेतकऱ्यांना मंजूर नाही. त्यामुळे आंदोलन मागे घेतलं जाणार नाही, असं शेतकरी नेते नरेश टिकैत यांनी म्हटलं आहे. दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलीस बळाचा वापर करण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीमार केला. याशिवाय अश्रूधुराच्या नळकांड्यादेखील फोडल्या. यावरुन काँग्रेससह सर्वच विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. शेतकऱ्यांचा एक गट हिंसक झाल्यानं काही पोलीस जखमी झाले. त्यामुळे सौम्य लाठीमार करण्यात आल्याचं स्पष्टीकरण पोलिसांकडून देण्यात आलं.
Kisan Kranti Padyatra: सरकारची आश्वासनं नामंजूर; शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2018 6:28 PM