"फारुख अब्दुल्ला आणि राहुल गांधी एकाच नाण्याच्या दोन बाजू’’ चीन, कलम ३७० वरील विधानांवरून भाजपाचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 06:45 PM2020-10-12T18:45:08+5:302020-10-12T18:47:15+5:30
Farooq Abdullah Statement News : फारुख अब्दुल्ला आणि राहुल गांधी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचा टोला भाजपा नेते संबित पात्रा यांनी लगावला आहे
नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी चीनची मदत घेऊ असे विधान जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी काल केल्याने नव्या वादास तोंड फुटले आहे. भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी फारुख अब्दुल्लांचे हे विधान देशविरोधी असल्याचा आरोप केला आहे. तसेच फारुख अब्दुल्ला आणि राहुल गांधी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचा टोला लगावला आहे.
फारुख अब्दुल्लांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना संबित पात्रा म्हणाले की, फारुख अब्दुल्ला आपल्या मुलाखतींमधून चीनच्या विस्तारवादी मानसिकतेला योग्य ठरवतात. दुसरीकडे जर संधी मिळाली तर चीनची मदत घेऊन आम्ही कलम ३७० परत आणू ,असे म्हणत देशद्रोह करणारे विधान करतात. याच फारुख अब्दुलांनी पाकव्याप्त काश्मीर तुमच्या बापाचा आहे का, असे विधान केल होते. पाकिस्तान आणि चीनबाबत यांच्या मनात असलेली आपुलकी आणि भारताविरोधातील कठोरता अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे.
यावेळी संबित पात्रा यांनी राहुल गांधींवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, केवळ फारुख अब्दुल्लाच असे करतात असे नाही तर तुम्ही भूतकाळात डोकावून राहुल गांधींची हल्लीच्या काळातील काही विधाने ऐकली तर फारुख अब्दुल्ला आणि राहुल गांधी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे दिसून येईल. सर्जिकल स्ट्राइक आणि एरअर स्ट्राइकबाबत प्रश्न निर्माण करून राहुल गांधी पाकिस्तानात हीरो बनले होते. आता फारुख अब्दुल्ला चीनमध्ये हीरो बनले आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
यापूर्वी २४ सप्टेंबर रोजी फारुख अब्दुल्ला यांनी जर जम्मू काश्मीरमध्ये गेलात आणि लोकाना तुम्ही भारतीय आहात का असं विचारलं तर त्याचं उत्तर ते नाही असे देतील. बरं झालं असतं जर आम्ही चिनी असतो, असं विधान केलं होतं. देशाच्या सार्वभौमत्वावर प्रश्न उपस्थित करणे, स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह लावणे हे एका खासदाराला शोभते का, ही देशविरोधी विधाने नाहीत का, अशी विचारणाही संबित पात्रा यांनी केली आहे.
दरम्यान, काल आज तक या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना फारुख अब्दुल्ला यांनी एलएसीवर जी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे त्यासाठी केंद्र सरकार जबादार आहे कारण त्यांनी कलम ३७० रद्द केले आहे, असा आरोप केला होता. चीनने कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाला कधीही पाठिंबा दिलेला नाही. आता कलम ३७० चीनच्या मदतीने पुन्हा लागू करता येईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे, असे विधान केले होते.