श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. अब्दुल्ला यांनी भारत माता की जय आणि जय हिंदचा नारा दिला होता. त्यानंतर, काश्मीरमध्ये त्यांना लोकांच्या क्रोधाचा सामना करावा लागला. बुधवारी बकरी ईदची नमाज पडण्यासाठी फारुक अब्दुल्ला गेले होते, त्यावेळी त्यांना विरोध करण्यात आला. तसेच त्यांना धक्काबुक्कीही करण्यात आली असून त्यांच्याकडे चप्पल फेकल्याचेही सांगण्यात येत आहे.
बकरी ईदनिमित्त मस्जीदमध्ये नमाज पडण्यासाठी गेल्यानंतर फारुक यांना लोकांच्या क्रोधाचा सामना करावा लागला. त्यावेळी ते काही वेळ गप्प राहिले, पण लोकांचा विरोध वाढतच गेल्याने त्यांनी मस्जीदमधून काढता पाय घेतला. मात्र, जर वेडसर लोकांना वाटत असेल की, त्यांच्या अशा वागण्यामुळे मी घाबरेल. पण, मला 'भारत माता की जय' म्हणण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. तसेच मी घाबरलो नाही, आंदोलकांच्या या वागणुकीचा माझ्यावर काहीही परिमाण होणार नाही. भारत देश पुढे जात असून काश्मीरलाही आपल्या पायावर उभे राहायचे आहे. मात्र, आंदोलनकर्त्यांनी नमाजावेळी असे करणे चुकीचे आहे. यासाठी त्यांनी दुसरी वेळ निवडायला हवी होती, असेही अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.
ईद-उल-अजहा म्हणजेच बकरी ईदच्या निमित्ताने येथील हजरतबल मस्जीदमध्ये फारुक अब्दुल्ला नमाज पठण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी शेकडो स्थानिक नागरिक या मस्जीदमध्ये नमाज पडण्यासाठी आले होते. येथील इमामांच्या नमाज पठणापूर्वीच अब्दुलांच्या नावाने त्यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू करण्यात आली. त्यानंतर अब्दुल्ला यांनी तेथून पळ काढला. पण, भारत आणि पाकिस्तान यांच्यात आता शांतीपूर्ण चर्चेची वेळ आली आहे. द्वेष भावनेतून बाहेर पडण्याची हीच खरी वेळ आहे. हा देश हिंदू, मुस्लीम, शिख, ईसाई आणि येथील रहिवाशांचा आहे. दरम्यान, अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहताना, फारुक अब्दुल्ला यांनी भारत माता की जय आणि जय हिंदचा नारा दिला होता. त्यामुळे तेथील लोकांनी त्यांचा विरोध केला आहे.