जम्मू : केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांचा विधानसभा निवडणूक (Assembly Elections 2021) कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आता राजकीय वातावरण आणखी तापताना पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ((PM Narendra Modi)) आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकल्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. अशातच आता नॅशनल कॉन्फरन्सचे नेते, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार फारूक अब्दुल्ला (farooq abdullah) यांनी मोठे विधान केले आहे. एका मुख्यमंत्र्यांनी मला फोन करून ममता दीदींसोबत काम करण्यासाठी ५० लाख रुपयांची ऑफर दिली, असा दावा फारूक अब्दुल्ला यांनी केला आहे. (farooq abdullah claimed a chief minister offered fifty lakh rupees to work with mamata banerjee)
उधमपूर येथील ग्रामीण भागाचा दौरा करताना बट्टलबालियां भागात एका सभेला संबोधित करताना फारूक अब्दुल्ला यांनी सदर दावा केला आहे. ०५ ऑगस्टनंतर जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थिती बदलली आहे. जम्मू-काश्मीरमधील युवक, तरुण रोजगारासाठी तळमळत आहेत. तर, दुसरीकडे दहशतवाद फोफावत चालला आहे, असे फारूक अब्दुल्ला म्हणाले.
पश्चिम बंगालमध्ये भाजपला दोन आकडी संख्येवर समाधान मानावे लागेल: नवाब मलिक
एका मुख्यमंत्र्याची ऑफर
विरोधक राजकारणासाठी कोणत्याही पातळीवर जात आहेत. देशात धर्माच्या नावावर राजकारण केले जात आहे. नॅशनल कॉन्फरन्सकडून कधीही धर्माच्या नावावर राजकारण केले गेले नाही. सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केला. पाच वर्षांपूर्वी एका मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता. पाच तारखेला कोलकाता येथे जायचे असल्याचे तो म्हणाला. आपण एकत्रित मिळून ममता दीदींसोबत काम करूया. या बदल्यात ५० लाख रुपये देतो, अशी ऑफर दिली. ही गोष्ट ऐकून मी हैराण झालो, असा एक किस्सा फारूक अब्दुल्ला यांनी सांगितला.
आरक्षणाच्या नावावर विभाजनाचा डाव
आरक्षणाच्या नावाखाली जम्मू-काश्मीरमध्ये विभाजनाचा डाव असल्याचा आरोप फारूक अब्दुल्ला यांनी यावेळी केला. विरोधकांकडून विभाजनकारी रणनिती राबवली जात असल्याची टीकाही त्यांनी केली. दरम्यान, फारूक अब्दुल्ला यांची खासदारकी रद्द करून देशद्रोहाचा खटला चालवावा, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच फेटाळली. याचिकाकर्ता आरोप सिद्ध करू न शकल्यामुळे त्यांना दंडही ठोठावण्यात आला.