श्रीनगर - जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य करुन खळबळ उडवून दिली आहे. फारुख अब्दुल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला आव्हान देत म्हटले आहे की, ''हिंमत असल्यास श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकवून दाखवा''. कठुआच्या दौ-यावर असताना फारुख अब्दुल्ला यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
काही दिवसांपूर्वी फारुख अब्दुल्ला यांनी पीओके हा पाकिस्तानचा भाग असून तो कुणीही हिसकावून घेऊ शकत नाही, असे विधान केले होते. यावरून त्यांच्यावर चौफेर टीकादेखील झाली होती. पाकव्याप्त काश्मीर हा पाकिस्तानाचाच हिस्सा आहे आणि यावरुन भारत-पाकिस्तानामध्ये कितीही युद्ध झाले तरीही ही स्थिती बदलणार नाही, असे विधान फारुख अब्दुल्ला यांनी केले होते.
''पाकव्याप्त काश्मीर भारताच्या बापाचे नाही''काही दिवसांपूर्वी पाकव्याप्त काश्मीर भारताच्या बापाचे नाही, असे फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले होते. काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ असलेल्या उरी येथे एका कार्यक्रमात अब्दुल्ला म्हणाले होते की, "कधीपर्यंत निरपराध लोकांच्या रक्ताचे पाट वाहत राहणार आणि कधीपर्यंत आम्ही पाकव्याप्त काश्मीर आमचे आहे म्हणून सांगत राहणार. काश्मीर यांच्या बापाचे नाही आहे." "काश्मीरची विभागणी होऊन 70 वर्षे झाली. नियंत्रण रेषेपलिकडे पाकिस्तान आहे आणि हे हिंदुस्तान आहे. 70 वर्षांत तो भाग हे परत मिळवू शकलेले नाहीत. तरीही आता पाकव्याप्त काश्मीर आमचा भाग आहे म्हणून सांगताहेत,"असेही अब्दुल्ला पुढे म्हणाले.
अब्दुल्ला यांच्या या विधानाचा देशभरात विरोध सुरू असतानाच त्यांनी आता पुन्हा तिरंगा फडकवण्यासंदर्भात वादग्रस्त विधान केले आहे. रविवार अब्दुल्ला कठुआच्या दौ-यावर होते, यावेळी येथील लोकांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांना काळे झेंडे दाखवले. अब्दुल्ला यांच्याविरोधात निदर्शनं करणा-या लोकांनी 'हिंदुस्थान जिंदाबाद, भारत माता की जय', अशी नारेबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी सरकारच्या पीओकेवर तिरंगा फडकवण्याच्या विधानाची खिल्ली उडवली.
येथील जनतेला संबोधित करताना अब्दुल्ला म्हणाले की, ''पीओकेपूर्वी भारत सरकारनं श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकवून दाखवा''. केंद्र सरकारची खिल्ली उडवत अब्दुल्ला पुढे असेही म्हणाले की, ''येथे तिरंगा फडकवू शकत नाहीत आणि पीओकेवर तिरंगा फडकवण्याच्या गोष्टी करत आहेत''. दरम्यान, फारुख अब्दुल्ला यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.