'चुका होतात, पण...', 'INDIA' आघाडीच्या भवितव्यावर फारुख अब्दुल्ला स्पष्ट बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 15:27 IST2025-02-12T15:27:02+5:302025-02-12T15:27:37+5:30
'...तर कदाचित दिल्लीचा निकाल वेगळा लागला असता.'

'चुका होतात, पण...', 'INDIA' आघाडीच्या भवितव्यावर फारुख अब्दुल्ला स्पष्ट बोलले
Farooq Abdullah Over India Alliance: दिल्लीत आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर विरोधकांनी स्थापन केलेल्या INDIA आघाडीच्या भवितव्याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. अशातच, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. 'आघाडीचा आत्मा एकच आहे, पण कधी कधी आपल्याकडून चुका होतात,' असं ते म्हणाले.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख म्हणाले की, काँग्रेस-आप यांच्यात युती का होऊ शकली नाही, हे मला माहीत नाही, पण आघाडीत सहभागी सर्व नेते एकत्र येऊन चर्चा करतील. दिल्लीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात आघाडी झाली असती, तर कदाचित निकाल वेगळा लागला असता.'
दरम्या, फारुख अब्दुल्ला यांनी यापूर्वीही इंडिया आघाडीबाबत वक्तव्य केले होते. या आघाडीचे उद्दिष्ट व्यापक असल्याचे आहे. ही आघाडी फक्त निवडणुकीसाठी नव्हती, तर देश आणि संविधानाच्या रक्षणासाठी होती. इथल्या लोकांमध्ये निर्माण झालेला द्वेष संपवण्यासाठी ही आघाडी खूप महत्त्वाची आहे, असं ते म्हणाले होते.
दिल्लीत 'आप'चा दारुण पराभव
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल 8 फेब्रुवारी रोजी जाहीर झाले. यामध्ये आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला. AAP ला फक्त 22 जागा मिळाल्या, तर 27 वर्षांनंतर भाजप पुन्हा सत्तेत आला. 48 जागा जिंकून भाजपने पूर्ण बहुमत मिळविले आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा एकही जागा जिंकता आली नाही.