नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांचं एक वक्तव्य सध्या चर्चेचा विषय आहे. मी मुस्लीम आहे, पण माहिती नाही का मला रामाबद्दल खूप जिव्हाळा आहे, असं वक्तव्य फारूख अब्दुल्ला यांनी केलं आहे. इतकंच नाही, तर त्यांनी रामाच्या नावाचं भजनंही गायलं. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं आहे. या कार्यक्रमात फारूख अब्दुल्ला यांना जम्मू-काश्मीर, काश्मीरी पंडीत, धर्म, राजकारण अशा विविध मुद्द्यांवर प्रश्न विचारण्यात आले.
या कार्यक्रमात बोलताना फारूख अब्दुल्ला म्हणाले की, मी मुस्लीम आहे पण माहिती नाही का पण मला रामाशी खूप जिव्हाळा आहे. मुस्लीम लोक मला हिंदू समजतात आणि हिंदू लोक मला मुसलमान समजतात. यावेळी त्यांनी काश्मीरमधील समस्येवरही मतं मांडली. जम्मू-काश्मीरच्या समस्येवर तोडगा नक्की निघेल. पण कधी ? याचं उत्तर माझ्याकडे नाही. भारत पाकअधिकृत काश्मीरला पाकिस्तानपासून परत घेऊ शकत नाही. भारत व पाकिस्तान या दोन्हीही देशात संभाषण न होता शांतता प्रस्थापित करणं कठीण आहे. भारत व पाकिस्तानमध्ये योग्य संभाषण होत नाही तोपर्यंत घुसखोरी बंद होणार नाही.
सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल प्रतिक्रिया देताना फारूख अब्दुल्ला यांनी म्हंटलं की, वाटाघाटीच्या राजकारणापासून देशाला वाचविण्याची गरज आहे. भारत पाकिस्तानशी संवाद का साधू शकत नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.