श्रीनगर : जम्मू काश्मिरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फ्रेंसचे ज्येष्ठ नेता फारुक अब्दुल्ला यांनी भारत-पाकिस्तान फाळणीबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. मोहम्मद अली जिना यांच्यामुळे नव्हे तर पंडित नेहरू, मौलाना आझाद आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामुळे देशाची फाळणी झाली असा खळबळजनक आरोप जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी केला आहे.
पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यामुळे भारताचं विभाजन झालं आणि पाकिस्तानचा जन्म झाला, असं अब्दुल्ला म्हणाले. पाकिस्तानच्या निर्मितीसाठी मोहम्मद अली जिना आग्रही नव्हते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वेगळं मुस्लिम राष्ट्र तयार करण्याचा मुद्दा उपस्थित झाला, तेव्हा एका आयोगाची स्थापना करण्यात आली. देशाची फाळणी होण्याऐवजी मुस्लिमांसाठी वेगळे नेतृत्त्व असेल असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. तसेच अल्पसंख्य आणि शिख यांच्यासाठी वेगळी यंत्रणा असेल असेही समितीने म्हटले होते. मोहम्मद अली जिना यांना हा प्रस्ताव मंजूर होता. मात्र, जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद आणि सरदार पटेल या तिघांनाही हा प्रस्ताव धुडकावला. त्यानंतर जिना यांनी पाकिस्तानची मागणी केली, असं अब्दुल्ला म्हणाले. त्यावेळी पंडित नेहरू, मौलाना आझाद आणि सरदार पटेल या तिन्ही वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेण्यात चूक केली नसती तर देशाची फाळणी झालीच नसती असंही अब्दुल्ला म्हणाले. त्यावेळी जी तिरस्काराची बीजं रोवली गेली, मात्र त्याची किंमत आजही देशाला चुकवावी लागत आहे. धर्म, जात आणि क्षेत्र यांच्या आधारावर आपण कधीपर्यंत लोकांमध्ये फूट पाडत राहणार?' असा सवालही फारुक अब्दुल्लांनी उपस्थित केला.