Congress Bharat Jodo Yatra: कन्याकुमारीतून सुरू झालेली काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' (Congress Bharat Jodo Yatra) जम्मू-काश्मीरमध्ये संपणार आहे. ही यात्रा जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचल्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) हेदेखील काँग्रेसच्या यात्रेत सहभागी होणार आहेत. खुद्द फारुख अब्दुल्ला यांनीच ही माहिती दिली. देशाची एकता आणि अखंडता राखणे ही काळाची गरज असल्याचे ते म्हणाले.
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीरपर्यंत 'भारत जोडो यात्रा' सुरू केली आहे. सध्या ही यात्रा मध्य प्रदेशात असून, हळुहळू काश्मीरकडे जात आहे. दरम्यान, फारुख अब्दुल्ला यांनी मीडियाला सांगितले की, “लखनपूरपासून जम्मू-काश्मीर सुरू होते, यात्रा तिथे पोहोचल्यावर मी राहुल गांधींसोबत यात्रेत सहभागी होईल. देशाच्या एकात्मतेसाठी आणि अखंडतेसाठी आम्ही एकत्र येऊ. संघटित राहणे ही काळाची गरज आहे.” अब्दुल्ला सध्या संसदीय समितीच्या बैठकीसाठी नवी दिल्लीत आहेत.
भारत जोडो यात्रा सध्या मध्य प्रदेशात भारत जोडो यात्रा आज सकाळीच मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यात दाखल झाली आहे. बोदर्ली गावात पोहोचताच या यात्रेचे जल्लोषात व पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. गावात पोहोचल्यावर राहुल गांधी यांची आरती करण्यात आली. त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. माजी मुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष कमलनाथ यांनी त्यांचे स्वागत केले. माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, माजी केंद्रीय मंत्री अरुण यादव यांच्याशिवाय इतर सर्व नेते राहुल गांधींच्या दौऱ्यात सोबत आहेत.