मुंबई : 1993 मुंबई स्फोटातील मुख्य आरोपींपैकी एक मोहम्मद फारुख उर्फ फारुख टकला याला गुरूवारी दुबईहून भारतात आणण्यात आलं. त्याला न्यायालयाने 19 मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. दुसरीकडे, त्याच्या जुळ्या भावाने माझ्यामुळे फारूख टकला पकडला गेला असा दावा न्यायालयात केला आहे. माझ्यामुळेच फारूख टकला भारतात आला आणि पकडला गेला असं त्याचा भाऊ न्यायालयात म्हणाला. यासिन मन्सूर मोहम्मद फारुख उर्फ फारुख टकला याला बॉम्बस्फोटांनंतर 25 वर्षांनी दिल्लीत अटक करण्यात आली. त्या बॉम्बस्फोटात 257 जण ठार व सुमारे 82 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. फारुख टकला दाऊदचा दुबईमधील कारभार सांभाळत होता.दोन भावांचा फिल्मी ड्रामा - गुरुवारी संध्याकाळी 6.45 च्या सुमारास टकला याला न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी त्याचा जुळा भाऊ अहमद तेथेच तळ ठोकून होता. बॉम्बस्फोट मालिकेनंतर मुंबई पोलीस व सीबीआयने दोघांचाही शोध सुरू केला होता. यामध्ये मुंबईत असलेला अहमद याला अटक केली, तर फारुख टकला पसार झाला. पुढे अहमद या खटल्यातून सुटला. टकला न्यायालयात येताच अहमदने त्याची गळाभेट घेतली. दोघांनाही रडू कोसळले, तसेच सुनावणी दरम्यानही त्याने मध्येच टकलाला काही तरी सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा न्यायाधीशाने त्याला दम भरला. त्यानंतर ‘गलती हो गयी’ म्हणून तो खाली बसला. त्यानंतर त्याला पुन्हा बोलण्याची संधी देण्यात आली त्यावेळी अहमद म्हणाला 'सर्व सीबीआय अधिकारी मला ओळखतात, माझ्यामुळेच फारूख भारतात आला. मला त्याची काळजी वाटते'. त्यानंतर सीबीआयने न्यायालयाला अहमद मंसूरच्या मदतीनेच फारुखपर्यंत पोहोचू शकल्याचे सांगितल्यावर अहमदला चक्कर आली व तो खाली कोसळला.