छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यातील खुज्जी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या महिला आमदार छन्नी साहू यांच्यावर एका हल्लेखोराने जीवघेणा हल्ला केला आहे. या दरम्यान, आमदाराच्या हाताला दुखापत झाली आहे. तर पोलिसांनी या घटनेबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे आमदारांच्या सुरक्षेमध्ये झालेल्या चुकीनंतर राज्याच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सांगण्यात येत आहे की, आरोपी मद्याच्या नशेमध्ये होता. त्यानंतर लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
रविवारी खुज्जी विधानसभा मतदारसंघातील आमदार असलेल्या छन्नी साहू ह्या जोधरा गावामध्ये भूमि पूजनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आल्या होत्या. कार्यक्रमाच्या ठिकाणी आजूबाजूच्या गावातून आलेल्या लोकांनी गर्दी झाली होती. यादरम्यान गर्दीमधील आरोपीने मागून येत आमदारांवर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांना किरकोळ जखमा झाला. त्यानंतर प्राथमिक उपचारांनंतर त्यांना घरी पाठवण्यात आले.
दरम्यान, आमदार छन्नी साहू यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला पकडून जमावाने त्याला मारहाण केली. त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या पीएसओ आणि सुरक्षारक्षकांनी आरोपीला पकडून बाहेर नेले. तसेच हल्लेखोर आरोपी हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचं सांगण्यात येत आहे. याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळावर पोहोचलेल्या पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आता आरोपीची कसून चौकशी केली जात आहे.
या हल्ल्यामध्ये आमदारांच्या हाताला दुखापत झाली आहे. हल्ल्यानंतर घटनास्थळावर एकच खळबळ उडाली. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी स्थानिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले. मात्र आमदारांवर झालेल्या हल्ल्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.