बंगळुरू: कर्नाटकमध्ये लव्ह ट्रँगलमधून धक्कादायक प्रकार घडला आहे. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील सोमेश्वर बीचवर एका तरुणानं त्याच्या दोन्ही प्रेयसींना एकाचवेळी भेटण्यासाठी बोलावलं होतं. त्यानंतर त्यांच्यात वाद झाला. एका प्रेयसीनं समुद्रात उडी घेतली. तिला वाचवण्यासाठी तरुणानं पाण्यात झेप घेतली. प्रेयसीला वाचवण्यात त्याला यश आलं. मात्र स्वत:चा जीव गेला. लॉईड डिसुझा असं तरुणाचं नाव आहे. तो २८ वर्षांचा होता.
लॉईड डिसुझा इलियारपडावूचा रहिवासी आहे. एकाचवेळी त्याचे दोन तरुणींशी प्रेमसंबंध होते. याबद्दल बोलण्यासाठी त्यानं दोघींनी एकाचवेळी समुद्र किनारी बोलावलं होतं. त्यावेळी एका प्रेयसीसोबत त्याचा वाद झाला. नाराज झालेल्या प्रेयसीनं समुद्रात उडी मारली. त्यावेळी समुद्रात उंचच उंच लाटा उसळत होत्या. प्रेयसीला वाचवण्यासाठी लॉईडनं समुद्रात उडी घेतली. प्रेयसी वाचली, मात्र लॉईड बुडू लागला.
लॉईडला बुडताना पाहून आसपास असलेल्या लोकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. लोकांना त्याला समुद्रातून बाहेर काढत किनाऱ्यावर आणलं. मात्र त्याला वाचवण्यात यश आलं नाही. लॉईड अबुधाबीत काम करायचा. कोरोना संकट काळात तो त्याच्या गावी आला. वर्षभरापासून तो इथे वास्तव्यास होता. या कालावधीत सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची दोन तरुणींशी ओळख झाली. त्यानंतर एकाचवेळी त्याने दोघींशी प्रेमसंबंध ठेवले.
गेल्या काही दिवसांपासून तिघांमध्ये वाद सुरू होते अशी माहिती मंगळुरूच्या पोलीस आयुक्तांनी दिली. सतत होणारे वाद मिटवण्यासाठी लॉईडनं दोन्ही प्रेयसींना एकाचवेळी समुद्र किनाऱ्यावर बोलावलं. त्यावेळी एक प्रेयसी संतापली. तिनं समुद्रात उडी घेतली. तिला वाचवताना लॉईडचा मृत्यू झाला.