वेंकटेश केसरी नवी दिल्ली : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या राष्ट्रीय स्तरावर बिगरभाजप, बिगरकाँग्रेस आघाडी बांधण्याच्या प्रयत्नांना तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांना पाठिंबा जाहीर केला असला तरी त्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी जवळीक वाढवताना दिसत आहेत.
काँग्रेसचे राज्यसभेचे पश्चिम बंगालमधील उमेदवारअभिषेक मनु संघवी यांना ममता बॅनर्जी यांनी पाठिंबा दिला असला तरी बंगालमध्ये तृणमूल व काँग्रेस एकत्र आल्यास तिथे भाजपाला विरोधी पक्ष म्हणून विस्ताराची संधी मिळेल, हे ममता बॅनर्जी ओळखून आहेत. त्यामुळे त्यांनी भाजपविरोधात काँग्रेसला सरसकट पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला नाही. डाव्यांना बंगालमध्ये एकाकी पाडणे हा ममतांचा हेतू आहे. पण भाजपविरोधी मतांचे एकत्रीकरणही करायचे आहे.
उत्तर प्रदेशमध्ये भाजपविरोधात समाजवादी पार्टी व बसपा जवळ येत असतानाच, तेलगू देशमच्या दोन केंद्रीय मंत्र्यांनी नुकताच मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तेलगू देशम, शिवसेना, एलजेपी, आरएलएसपी हे मित्रपक्षही भाजपसोबत राजकीय सौदेबाजी करावी की रालोआला सोडचिठ्ठी द्यावी, यासाठी संधीची वाट पहात आहेत.
पण काँग्रेससोबत जाण्याविषयी बिजू जनता दल, अण्णा द्रमुक, आप, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, जनता दल (सेक्युलर), तेलगू देशम पार्टी व व्हायएसआर काँग्रेस यांच्या भूमिका स्पष्ट नाहीत. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, नॅशनल कॉन्फरन्स हेच काँग्रेससमवेत आहेत. द्रमुक व अजित सिंह यांच्या राष्ट्रीय लोक दलही कधी कुठे जातील, हे सांगणे अवघड आहे. विरोधकांचे भोजनसोनिया गांधी यांनी उद्या, मंगळवारी स्नेहभोजनासाठी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना निमंत्रण दिले आहे. त्यात टीआरएसच्या चंद्रशेखर राव यांचाही समावेश आहे. हे स्नेहभोजन आणि आणि नंतर होणारे काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन यानंतरच भविष्यातील राजकीय समीकरणे कशी असतील, हे स्पष्ट होईल.