नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या भीमा-कोरेगावमध्ये (Bhima-Koregaon Violence) 2018 मध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) मोठी कारवाई केली आहे. 83 वर्षीय सामाजिक कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी (Father Stan Swamy) यांना झारखंडमधूनअटक करण्यात आली आहे. भीमा-कोरेगाव प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एनआयएच्या टीमने गुरुवारी रात्री फादर स्टेन स्वामी यांना नामकुम स्टेशन हद्दीत येणाऱ्या बगईंचा स्थित त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतलं. जवळपास 20 मिनिटे चौकशी केल्यानंतर स्वामी यांना अटक केली.
स्वामी यांना शुक्रवारी एनआयए न्यायालयासमोर हजर केलं जाण्याची शक्यता आहे. फादर स्टेन स्वामी यांना रिमांडवर घेतलं जाऊ शकतं किंवा ट्रान्झिट रिमांडवर त्यांना दिल्लीला आणलं जाऊ शकतं. मिळालेल्या माहितीनुसार, भीमा-कोरेगाव प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली असून ते मूळचे केरळचे रहिवासी आहेत. याआधीही स्वामींची एनआयएकडून चौकशी करण्यात आली होती. माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून त्यांची चौकशी करण्यात आली होती.
"फादर स्टॅन स्वामी यांनी आपलं संपूर्ण आयुष्यच आदिवासींच्या अधिकारासाठी लढण्यात घालवलं"
'फादर स्टॅन स्वामी हे एक सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी जवळपास पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्यच आदिवासींच्या अधिकारासाठी लढण्यात घालवलं आहे. झारखंडच्या आदिवासी क्षेत्रामध्ये ते काम करत आहेत. इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी स्वामी यांच्या अटकेला विरोध सुरू केला आहे. ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "फादर स्टॅन स्वामी यांनी आपलं संपूर्ण आयुष्यच आदिवासींच्या अधिकारासाठी लढण्यात घालवलं. त्यामुळेच मोदी सरकार अशा लोकांना गप्प करण्याच्या मागे आहे. कारण या सरकारासाठी कोळसा खाण कंपन्यांचा फायदा आदिवासींचं आयुष्य आणि रोजगाराहून अधिक महत्त्वाचा आहे" असं रामचंद्र गुहा यांनी म्हटलं आहे.
भीमा-कोरेगाव प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्यांना आणि विचारवंतांना अटक
भीमा-कोरेगाव प्रकरणात आत्तापर्यंत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना आणि विचारवंतांना अटक करण्यात आली आहे. 1 जानेवारी 2018 मध्ये पुण्याच्या भीमा कोरेगावमध्ये एका कार्यक्रमादरम्यान हिंसाचार उफाळला होता. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आता फादर स्टॅन स्वामी यांना अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी एल्गार परिषद व कोरेगाव-भीमा प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले संशयित आरोपी कवी वरवरा राव यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती, त्यामध्ये त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
भीमा-कोरेगाव प्रकरणातील आरोपी वरवरा राव यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह
वरवरा राव यांचा विशेष एनआयए न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांनी या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या संशयावरून वरवरा राव (81) यांनी जामिनावर सुटकेसाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, 26 जून रोजी विशेष न्यायालयाने अर्ज फेटाळला. राव यांचा वैद्यकीय अहवाल आणि त्यानुसार कारागृह प्रशासनाने केलेले उपचार याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश तळोजा कारागृहाला द्यावेत. तसेच राव यांची तत्काळ वैद्यकीय तपासणी करावी आणि आवश्यकता भासल्यास त्यांना खासगी रुग्णालयात भरती करण्यात यावे, अशी विनंती याचिकेद्वारे करण्यात आली आहे.