ऑनलाइन लोकमत
कोच्ची, दि. 24 - केरळमध्ये 12 वर्षांचा मुलगा बाप झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे इतक्या कमी वयात बाप होणारा भारतातील तो पहिलाच आहे. त्याच्या मुलाला जन्म देणारी मुलगीही अल्पवयीन असून तिचं वय 16 वर्ष आहे. नोव्हेंबर 2016 मध्ये हे मूल जन्माला आलं.
या अल्पवयीन अविवाहित मुलीने एर्नाकुलम येथील रुग्णालयात मुलाला जन्म दिल्यानंतर ही घटना समोर आली. मूल जन्माला आल्यानंतर त्याचा पिता कोण आहे याची माहिती मिळवण्यासाठी वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. आई झालेल्या या मुलीने एक 12 वर्षांचा मुलगा आपल्या मुलाचा बाप असल्याचा दावा केला होता. द हिंदू वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार नवजात बालक आणि या मुलाची डीएनए टेस्ट करण्यात आली. यामधून हाच चिमुरडा या मुलाचा बाप असल्याचं सिद्ध झालं. मात्र प्रोटेक्टशन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सस अॅक्ट अंतर्गत बाप झालेल्या या मुलाच्या नावाचा खुलासा करण्यात आलेला नाही.
दोघेही अल्पवयीन मुलं एकमेकांचे नातेवाईक आहेत. पोलिसांनी प्रोटेक्टशन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सस अॅक्ट अंतर्गत केस दाखल करुन घेतली आहे. मात्र नंतर त्यांना जामीन देण्यात आला. इकडे वैद्यकीय अहवाल आल्यापासून दोघांचेही पालक आणि रुग्णालय प्रशासनाने तोंडावर बोट ठेवत शांत राहणं पसंद केलं आहे.