हैदराबाद - तेलंगणात विधानसभेच्या निवडणुकांचा जोर चांगलाच वाढला आहे. तर जवळपास सर्वच पक्षांच्या उमेदवारांची घोषणाही झाली आहे. आता, उमेदवारांकडून अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर तेलंगणातील गर्भश्रीमंत उमेदवारांची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये येथील 4 उमेदवारांची अधिकृतपणे एकूण संपत्ती 700 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. विशेष म्हणजे हे चारही उमेदवार चार वेगवेगळ्या पक्षाचे आहेत.
तेलंगणात विधानसभेच्या 119 जागांसाठी 7 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यासाठी 19 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांनी आपले अर्ज भरले आहेत. त्यामुळे उमेदवारांची सर्वच माहिती अधिकृतपणे निवडणूक आयोगाकडे आली आहे. त्यानुसार 4 उमेदवारांची अधिकृत संपत्ती तब्बल 700 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.
1. के राजगोपाल रेड्डी (काँग्रेस) - राजगोपाल रेड्डी यांची एकूण संपत्ती 300 कोटी रुपये आहे. ते तेलंगणातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. रेड्डी यांनी मुनुगोडे विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शपथपत्रामध्ये त्यांनी आपली संपत्ती 314 कोटी असल्याचे जाहीर केले आह. रेड्डी हे 2009 ते 2014 पर्यंत खासदार होते. तर, सध्या ते तेलंगणात विधानपरिषेदेच आमदार आहेत.
2. मरी जनार्दन रेड्डी (टीआरएस)- मरी जनादर्न रेड्डी यांची एकूण संपत्ती 161 कोटी रुपये आहेत. टीआरएस पक्षाचे नेते असलेल्या मरी जनार्दन रेड्डी हे तेलंगणातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत नेते आहेत. गतवर्षीच्या निवडणुकांवेळी त्यांची एकूण संपत्ती 111 कोटी रुपये एवढी होती. मरी जनार्दन रेड्डी आणि त्यांच्या पत्नी मरी जमुना रेड्डी हे दोघेही उद्योजक आहेत. त्यांचे गतवर्षीचे एकूण वार्षिक उत्पन्न 8 कोटी रुपये आहे.
3. जी. योगानंद (भाजपा) - भारतीय जनता पक्षाचे तेलंगणातील उमेदवार असलेल्या जी योगानंद यांची एकूण संपत्ती 146 कोटी रुपये असून ते तेलंगणातील तिसऱ्या क्रमांकाचे गर्भश्रीमंत उमेदवार आहेत. हैदराबादच्या सेरीलिंगमपल्ली विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवत आहेत.
4. नामा नागेश्वर राव (टीडीपी) - नामा नागेश्वर राव हे तेलुगू देसम पक्षाचे नेते असून त्यांची एकूण संपत्ती 113 कोटी रुपये एवढी आहे. नागेश्वर राव यांनी खमाम मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून ते चौथ्या क्रमांकाचे श्रींमत उमेदवार आहेत. सन 2009 ते 2014 पर्यंत ते लोकसभा खासदार म्हणूनही कार्यरत होते. विशेष म्हणजे देशातील श्रीमंत खासदारांच्या यादीत त्यांचे नाव आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकांवेळी त्यांनी 338 कोटी रुपये संपत्ती असल्याचे जाहीर केलं होतं. राव हे मधुकॉन ग्रुप ऑफ कंपनीचे संस्थापक आहेत. तसेच तेलंगणातील एक आघाडीचे उद्योजकही आहेत.