उत्तर प्रदेशच्या कानपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाळीव मांजर चावल्याने आठवडाभरात बाप-लेकाचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी या मांजरीला एका भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता, त्यामुळे तिच्या शरीरात इन्फेक्शन पसरला होतं. पण जेव्हा मांजरीने मुलगा आणि वडिलांना चावा घेतला तेव्हा त्यांनी हे हलक्यात घेतलं. त्यांनी यावर रेबीजचे इंजेक्शन घेतलं नाही. काही दिवसांनी त्यांची प्रकृती खालावू लागली.
हे संपूर्ण प्रकरण अकबरपूर कोतवाली परिसरातील अशोक नगरचं आहे. येथे राहणारे इम्तियाजुद्दीन हे नबौली प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक होते. त्याने घरात एक मांजर पाळली. या मांजरीला सप्टेंबर महिन्यात एका भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. यानंतर इम्तियाजुद्दीनने मांजरीला डॉक्टरांना दाखवलं. तिच्यावर उपचार सुरू होते. ऑक्टोबरच्या अखेरीस मांजरीने त्यांचा मुलगा अझीम याला चावा घेतला.
दोन तासांनंतर इम्तियाजुद्दीनलाही मांजरीने चावा घेतला. कुटुंबीयांनी ते गांभीर्याने घेतले नाही. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मांजराचा मृत्यू झाला. यानंतर 20 नोव्हेंबरला अझीमची प्रकृती बिघडू लागली. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, त्याच्यामध्ये रेबीजची लक्षणे दिसू लागली. ताबडतोब खासगी डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि इंजेक्शन घेतले. त्यानंतर त्याला घरी आणलं.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 नोव्हेंबर रोजी संपूर्ण कुटुंब एका नातेवाईकाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी भोपाळला गेले होते. 25 नोव्हेंबर रोजी कुटुंबीय लग्नाला आले होते. त्यावेळी अझीमची तब्येत पुन्हा बिघडू लागली. कुटुंबीयांनी त्याला डॉक्टरांकडे नेले. मात्र त्यांची प्रकृती सुधारण्याऐवजी अधिकच गंभीर होत गेली. अशा परिस्थितीत कुटुंबीय नाजिमसोबत कानपूरला येत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली.
काही दिवसांनी इम्तियाजुद्दीन यांची प्रकृती ढासळू लागली. त्यांना तात्काळ कानपूर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. पण प्रकृती बिघडत होती. त्याच्या कुटुंबीयांनी त्याला पीजीआयमध्ये नेले, जिथे त्याला दाखल करण्यात आले. मात्र गेल्या गुरुवारी इम्तियाजुद्दीनचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी इम्तियाजुद्दीनच्या पत्नीने संसर्ग झाल्याची बाब नाकारली आहे. तिने सांगितले की, पतीला शुगर आणि हाय ब्लड प्रेशर आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. पण इम्तियाजुद्दीनच्या शेजाऱ्यांचे म्हणणे आहे की वडील आणि मुलामध्ये रेबीजची लक्षणे स्पष्टपणे दिसत होती. त्यामुळे त्यांना जीव गमवावा लागला.