तिरुअनंतपुरम - केरळमध्ये एका अल्पवयीन तरुणीसोबत झालेल्या बलात्कार प्रकरणी विशेष पथकाने शनिवारी कारवाई करत आरोपी वडिलांना अटक केली. अटक केल्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीदरम्यान पोलिसांना काही धक्कादायक माहिती मिळाली आहे. पीडित अल्पवयीन तरुणीच्या वडिलांना दारुचं व्यसन होतं. बलात्कार प्रकरणी इतर सहा आरोपींना मदत केल्याच्या आरोपाखाली मुलीच्या वडिलांना अटक करण्यात आली. पोलिसांनी आधीच कारवाई करत सहा आरोपींना अटक केली आहे.
प्रकरणाचा तपास करणा-या अलापुझ्झाच्या पोलीस अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीच्या बापानेच आपल्या मुलीला मुख्य आरोपी मथीराकडे (24) सोपवलं होतं. मुलीला घेऊन जाण्याची परवानगी त्यानेच दिली होती. याबदल्यात त्याने काही पैसे घेतले होते, ज्यातून त्याने दारु विकत घेतली. पोलीस अधिका-याने सांगितल्यानुसार, 'अथीरा जेव्हा अल्पवयीन मुलीला घेऊन रात्री वेगवेगळ्या ठिकाणांवर गेला होता, तेव्हा त्याच्या डोक्यात काय चालू आहे याची कल्पना मुलीच्या बापाला होती'. तुमच्या माहितीसाठी, बुधवारी 17 जानेवारीला एका 15 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली होती. दोन पोलीस कर्मचा-यांसोबत एकूण सहा जण या गुन्ह्यात सामील होते.
पोलिसांनी सांगितल्यानुसार, फक्त 300 रुपयांच्या मोबदल्यात मुलीला भाड्याने देण्यात आलं होतं. दारु विकत घेण्यासाठी पैसे मिळावेत म्हणून हे धक्कादायक कृत्य करण्यात आलं होतं. अजून एक धक्कादायक गोष्ट म्हणजे या गुन्ह्यात दोन पोलीस कर्मचा-यांचाही समावेश आहे. नार्कोटिक्स सेलशी संबंधित अधिकारी नेल्सन थॉमस (40) आणि मरारीकुलमचे एएसआय केजी लायजू यांच्यासहित दोन अन्य तरुण (22 वर्षीय जिनुमन आणि 28 वर्षीय प्रिन्स) या प्रकरणात आरोपी आहेत. प्रकरण उजेडात आल्यानंतर दोन्ही पोलीस अधिका-यांना निलंबित करण्यात आलं आहे.
डीएसपींनी दिलेल्या माहितीनुसार, 'पीडित अल्पवयीन तरुणी आणि मुख्य आरोपी मथीराने दिलेल्या माहितीच्या आधारे इतर आरोपींना अटक करण्यात आली आहे'. सर्व आरोपींविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपींविरोधात ज्युवेनाईल जस्टिस अॅक्ट आणि पॉस्को अॅक्ट अंतर्गतही गुन्हा नोंद करण्यात आला आहे.