नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात गुरुवारी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दोन मुलींचं लग्न होण्याआधीच एका बापाने जगाचा निरोप घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी सायंकाळी मंडपात हळदीच्या कार्यक्रमादरम्यान घराजवळील झाडीत एका झाडाचं पान आणण्यासाठी गेलेले वडील दीनदयाळ यांना विषारी साप चावला. बुधवारी दुपारी त्यांचे निधन झाल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. लग्नाचा आनंद असलेल्या कुटुंबावर अचानक शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 12 मे रोजी सोनभद्रच्या बिजपूर पोलीस स्टेशन हद्दीतील जर्हा ग्रामपंचायतीच्या टोला बियाडोड येथील दीनदयाल गुर्जर यांच्या घरी लग्न होणार होतं. दोन मुलींच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू असतानाच मंगळवारी सायंकाळी हळदीच्या कार्यक्रमादरम्यान घराजवळील झाडीत पान आणण्यासाठी गेलेल्या दीनदयाळ यांना विषारी साप चावला. काही वेळाने प्रकृती बिघडल्याने नातेवाईकांनी रात्रीच रिहंदचे धन्वंतरी हॉस्पिटल गाठले. जिथे सर्व औषधोपचार करूनही प्रकृतीत सुधारणा न झाल्याने डॉक्टरांनी त्यांना इतर ठिकाणी हलवण्यास सांगितलं.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, दीनदयाळ यांना मध्यप्रदेशातील नेहरू रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. दुसरीकडे दीनदयाळ यांच्या निधनाची माहिती मिळताच कुटुंबीयांना धक्का बसला. याठिकाणी पोलिसांनी दीनदयाळ यांचा मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या घटनेनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. हसतं-खेळतं घर एका क्षणात उद्ध्वस्त झालं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.