अलमोडा - उत्तराखंडच्या अलमोडा येथे काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. याठिकाणी मुलीच्या लग्नात नाचता नाचता वडील खाली कोसळले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे लग्न मंडपात सुरू असलेल्या आनंदात विरजण पडलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपासाला सुरुवात केली.
दुसरीकडे या मुलीच्या नातेवाईकांनी शोकाकुळ वातावरणातच मुलीचा विवाह केला. मुलीच्या मामानं तिचं कन्यादान केले. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी एका युवतीचं हल्द्वानीमध्ये विवाह होणार होता. नवरी आणि तिचे कुटुंब हल्द्वानीला जायच्या तयारीत होते. त्याआधी युवतीच्या हळदीचा आणि मेहंदीचा कार्यक्रम अलमोडी येथील घरीच सुरू होता. हळदी समारंभात रात्री उशिरा आनंदी कुटुंब आणि नातेवाईक नाचत होते. त्यावेळी नवरी मुलीच्या वडिलांनीही मनसोक्त डान्स केला.
त्यावेळी अचानक नवरीचे वडील नाचता नाचता खाली कोसळले. या गोंधळात त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. ज्याठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने लग्नाच्या माहौलमध्ये शोक पसरला. मुलीच्या लग्नाला काही तासच उरले असताना वडिलांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत डॉक्टरांनी म्हटलं की, नवरीच्या वडिलांचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे झाला आहे. पोलिसांनी जबाब नोंदवून मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवला. त्यानंतर रविवारी घरच्यांनी नवरीच्या लग्नाचा विधी उरकून घेतला. नवरीचा मामा आणि अन्य नातेवाईक हाल्द्वनीला पोहचले. त्याठिकाणी लग्नसोहळा संपन्न झाला. मुलीच्या मामाने नवरीचं कन्यादान केले. त्यानंतर पुन्हा कुटुंब अलमोडाला पोहचले आणि वडिलांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.