Manju Hooda News : हरियाणामध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे. भाजपने पहिली यादी प्रसिद्ध करत 67 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. 67 पैकी एका नावाकडे सगळ्यांचे लक्ष वेधले गेले. हे नाव आहे मंजू हुड्डा यांचे. भाजपने मंजू हुड्डा यांना काँग्रेसचे नेते आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भुपेंद्र हुड्डा यांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे.
मंजू हुड्डा यांच्या नावाची चर्चा होण्याचे कारण त्यांची कौटुंबीक पार्श्वभू्मी आहे. मंजू हुड्डा यांचे वडील पोलीस अधिकारी होते, पण पती गँगस्टर आहेत. अशात त्यांना भाजपने थेट माजी मुख्यमंत्र्यांच्या विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्याने सगळ्याचे लक्ष या मतदारसंघातील निवडणुकी लागले आहे.
मंजू हुड्डा यांचे पती कोण आहेत?
भाजप उमेदवार मंजू हुड्डा यांच्या पतीचे नाव राजेश सरकारी आहे. हिस्ट्रीशीटर आणि रोहतकचे बाहुबली आहेत. मंजू हुड्डा यांनी राजेश सरकारी सोबत प्रेमविवाह केलेला आहे. राजेश सरकारी गँगस्टर असल्याचा मुद्दा विरोधकांकडून निवडणूक जोरात मांडला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे.
पती राजेश सरकारीविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्याबद्दल बोलताना मंजू हुड्डा म्हणाल्या की, "तो त्यांचा भूतकाळ होता. कोणत्या परिस्थितीत व्यक्तीकडून काय घडेल, हे सांगता येत नाही. माझ्या पतीने कोणासोबतही वाईट केलेले नाही. लोकांनी त्यांच्याबद्दल जाणून घेतले, तर कळेल की, त्यांच्याबद्दल जे ऐकले आहे, त्यापेक्षा ते खूप वेगळे आहेत."
राजेश सरकारीविरोधात राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणामध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण, लूट यासारख्या गंभीर घटनांप्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत.
मंजू हुड्डा उमेदवारी मिळाल्यानंतर काय म्हणाल्या?
मंजू हुड्डा सध्या रोहतक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आहेत. भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बोलताना मंजू हुड्डा म्हणाल्या की, "भुपेंद्र हुड्डा माझ्यासाठी वडिलांसमान आहेत आणि मी त्यांचे आशीर्वाद घेईन. जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून मी लोकांच्या हितासाठी काम केले. भाजपने मला संधी दिली आहे. त्याबद्दल मी पक्षाचे आभारी आहे", अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. मंजू हुड्डा या सेवानिवृत्त डीएसपी प्रदीप यादव यांच्या कन्या आहेत.