वल्लभगड-
छायासा परिसरातील नरियाळा गावात बुधवारी गदारोळ झाला. ८५ वर्षांच्या वृद्धाच्या मृत्यूनंतर, त्यांच्या ७ मुलांमध्ये असा तुफान राडा झाला की लाथा-बुक्क्यांनी हाणामारी झाली. मृतदेह स्मशानभूमीत नेत असताना सातही जणांमध्ये तीनवेळा हाणामारी झाली. ही माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांच्या उपस्थितीत वृद्धाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. अद्याप दोन्ही बाजूंनी पोलिसांत तक्रार दाखल झालेली नाही. हाणामारीत जखमी झालेल्या तीन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नरियाला गावात राहणाऱ्या एका व्यक्तीचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. मृत व्यक्तीला ७ मुलगे असून ते वेगळे राहतात. वडिलांच्या मृत्यूनंतर एका मुलाने मोठा अंत्यविधी सोहळा करण्याची मागणी केली. त्यास इतर ६ मुलांनी विरोध केला. यादरम्यान मुलांमध्ये वाद झाला. कसेबसे गावातील नागरिकांनी प्रकरण शांत केलं आणि कशीबशी अंत्ययात्रेला सुरुवात केली. पण वाटेत पुन्हा मुलांमध्ये भांडण सुरू झाले. भांडणाचे रुपांतर हाणामारीत झाले. अंत्ययात्रेला जाणाऱ्या लोकांनी मृतदेह रस्त्याच्या कडेला ठेवून प्रकरण शांत केलं, त्यानंतर सर्वजण स्मशानभूमीत पोहोचले.
एक मुलगा आणि दोन नातू रुग्णालयात दाखलअंत्ययात्रेतच सातही मुलांमध्ये राडा सुरू झाला आणि हाणामारी झाली. याची माहिती मग पोलिसांना देण्यात आली. तक्रारीनंतर पोलीस देखील घटनास्थळावर पोहोचले. अखेर पोलिसांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करावे लागले. इथं अंत्यसंस्कार होत असताना मुलांमध्ये झालेल्या हाणामारीची माहिती घरी पोहोचली आणि घरी असलेल्या महिलांमध्येही भांडण सुरू झालं. या संपूर्ण हाणामारीत ज्या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला त्याचा एक मुलगा आणि दोन नातू जखमी झाले. तिघांनाही सिविल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पोलीस अधिकारी कुलदीप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी कुटुंबाकडून कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही. तक्रार प्राप्त झाल्यास कारवाई करण्यात येईल. घटनेची माहिती मिळताच एक पथक घटनास्थळी पोहोचलं होतं. हाणामारीत सहभागी असलेल्या दोन्ही पक्षांना पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आलं आहे.