उत्तर प्रदेशमधील बांदा येथे एका शेतकऱ्याच्या घरातून लेकीची वरात निघण्यापूर्वी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. त्यामुळे एका क्षणात हसतं खेळतं घर उद्ध्वस्त झालं आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 एप्रिल रोजी मुलीचं लग्न ठरलं असून, घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. लग्नपत्रिका वाटपासाठी जात असताना रस्त्यात वडिलांची बैलगाडी उलटल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
कुटुंबीयांना घटनेची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली. पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली. शेतकऱ्याच्या मुलीचं लग्न मौदहा येथे ठरलं आहे. मात्र वडिलांच्या मृत्यूमुळे लग्नाआधीच घरात शोकाकुल वातावरण आहे.
पैलानी पोलीस स्टेशन परिसरात राहणारे 45 वर्षीय जयराम निषाद शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. जयराम यांची मुलगी रागिणी हिचं लग्न 18 एप्रिल रोजी ठरलं आहे. त्यावरून जयराम बुधवारी सायंकाळी घरून पोलीस ठाणे हद्दीतील रेती गावात लग्नपत्रिका वाटपासाठी जात होते. रस्त्यात बैलगाडीचा तोल गेला. काही समजण्यापूर्वीच बैलगाडी उलटली. त्यामुळे ते बैलगाडी आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले.
जवळच्या शेतात काम करणाऱ्या ग्रामस्थांनी हा प्रकार पाहिल्यानंतर ते मदतीसाठी धावले. जयराम यांना बाहेर काढून त्यांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे मुलीचं लग्न ठरल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं. संपूर्ण कुटुंब तयारीत व्यस्त होतं. मुलीचं लग्न मोठ्या थाटामाटात करायचं होतं.