बिहारमधील भागलपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका पित्याने आपल्या अल्पवयीन मुलीचे एका मोठ्या वयाच्या व्यक्तीशी लग्न लावून दिलं. मुलीला लग्न करायचं नव्हतं. पण तरीही वडिलांनी तिचं लग्न लावून दिलं, त्यानंतर तिने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून स्वत:साठी न्याय मागितला. मला शिक्षण घ्यायचं आहे, मला न्याय मिळवून द्या, नाहीतर मी मरेन असं 16 वर्षीय मुलीने सांगितलं आहे.
मुलीचे माहेर झारखंडच्या गोड्डा जिल्ह्यात आहे. व्हिडीओमध्ये मुलीने सांगितले की, "तिच्या आईचे गेल्या वर्षी म्हणजेच डिसेंबर 2022 मध्ये निधन झाले होते. वडील एका महिलेच्या संपर्कात आले आणि तिच्याशी लग्न केलं. मुलगी म्हणाली, वडिलांवर खूप कर्ज होते. तेव्हा 52 वर्षीय व्यक्तीने त्यांना सांगितलं की, तो त्यांचे कर्ज फेडणार आहे. त्या बदल्यात त्याने माझ्याशी लग्न करण्याची मागणी केली. सावत्र आईनेही वडिलांवर दबाव टाकला. मला याचा काहीच अंदाज नव्हता."
"मला जुलै महिन्यात फिरायला जातोय असं सांगून बाहेर नेलं. त्यानंतर तिथे माझं त्या व्यक्तीशी जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आले. या लग्नाला विरोध करत असल्याचं" मुलीने सांगितले. पण तिचं कोणीही ऐकलं नाही. लग्न करून ती भागलपूरला पोहोचली तेव्हा तिचा नवरा तिला रोज मारहाण करू लागला. तो तिला शिवीगाळही करायचा. तो बंदुकीचा धाक दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवायचा. हा सगळा छळ तिला सहन झाला नाही आणि एक दिवस तिने गुपचूप सासरच्या घरातून पळ काढला आणि भागलपूरमध्ये आपल्या मोठ्या बहिणीच्या सासरच्या घरी पोहोचली.
मुलीने सांगितले की, मंगळवारी तिने पती आणि वडिलांची तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशन गाठले. मात्र पोलिसांनी तिला मदत केली नाही. तर, हे प्रकरण या राज्याचं नाही, असं सांगून तिला पोलीस ठाण्यातून परत पाठवण्यात आलं. यानंतर ती इसाकचक पोलीस ठाण्यात गेली मात्र तेथेही तिची तक्रार ऐकून घेण्यात आली नाही. याला कंटाळून मुलीने व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर टाकला. व्हिडीओच्या माध्यमातून न्याय मागितला आहे. मला न्याय मिळाला नाही तर मी मरेन, असे सांगितलं
या प्रकरणी भागलपूरचे एसपी आनंद कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बाब त्यांच्या निदर्शनास आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. मुलगी अल्पवयीन असेल तर तिच्या कुटुंबीयांवरही कारवाई केली जाईल. ती मुलगी सांगत आहे की, तिचा जन्म 2007 मध्ये झाला होता. तिचे दहावीपर्यंत शिक्षण झालं आहे. त्यानंतर तिचं लग्न झालं. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.