सध्या देशभरात अनेक परीक्षांचे निकाल येत आहेत. या निकालांमध्ये अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी समोर आल्या आहेत ज्या लोकांसाठी प्रेरणादायी आहेत. सध्या गुजरातमधील एका बाप-लेकाच्या जोडीची खूप चर्चा रंगली आहे. या जोडीने एकत्र परीक्षा दिली होती आणि त्यात दोघेही यशस्वी झाले आहेत. वडील आणि मुलाने परीक्षेत एकाचवेळी घवघवीत यश संपादन केलं आहे.
गुजरात बोर्डाच्या परीक्षेचा निकाल लागला आहे. यामध्ये पिता-पुत्र जोडीने हायस्कूलची परीक्षा एकत्र उत्तीर्ण केली आहे. या दोघांनीही परीक्षेत यश मिळवल्यानंतर त्यांच्या घरात जल्लोषाचे वातावरण आहे. त्याची गोष्ट अलीकडेच सोशल मीडियावर व्हायरल झाली, त्यामुळे देशभरातील लोकांनी ती वाचली, त्याची गोष्ट खूपच मजेदार आहे. दोघांनी एकत्र परीक्षा कशी दिली हे देखील रंजक आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बाप-लेक दोघे गुजरातमधील अहमदाबादचे रहिवासी आहेत. वडिलांचे नाव वीरभद्र, तर मुलाचं नाव युवराज असं आहे. या दोघांनी येथील द्वारकादास परमानंद उच्च माध्यमिक विद्यालयातून दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. वीरभद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी 1998 मध्ये शाळा सोडली आणि कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांना नोकरी करावी लागली.
काही काळापूर्वी मुलगा युवराज दहावीची तयारी करत असल्याचे पाहून वीरभद्र त्याच्यासोबत परीक्षेला बसले. त्यांना शाळेची मदतही मिळाली. युवराजने 79% तर वीरभद्रला 45% गुण मिळाले. वडिलांसोबत परीक्षा देण्याचा अनुभव खूप चांगला असल्याचे युवराजने सांगितले. आम्ही एकत्र परीक्षेची तयारी केली आणि मी माझ्या वडिलांना मित्र म्हणून मदत केली. वीरभद्र यांनी सांगितले की, त्यांना पुढे शिक्षण घ्यायचे आहे. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.