नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत हायप्रोफाईल परिसरात सुरक्षेचा बोजवारा निघाल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं आहे. लुटयंस दिल्ली येथे हाय सिक्युरिटी झोनमध्ये पाकिस्तानच्या उच्चायुक्ताचं कार्यालयात आहे. या कार्यालयाबाहेर उभ्या असणाऱ्या एका कारमध्ये ४० वर्षीय एक व्यक्ती आणि त्याच्या मुलाला पाहिलं. हे दोघंही मानसिक रुग्ण असल्याचं पोलीस म्हणत आहेत. दोघांनाही प्रश्नांची उत्तरं देणंही येत नाही.
पोलिसांच्या माहितीनुसार, मागील ७ दिवसांपासून हे दोघंही भाड्याच्या गाडीत राहत होते. एक आठवडा कार हाय सिक्युरिटी झोनमध्ये उभी राहते आणि कुणालाही त्याची भनक लागत नाही यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. बाप-लेक गाडीत हेल्मेट घालून राहत होते. एका सायन्स फिक्शन सिनेमासारखी त्यांची स्क्रिप्ट आहे. वडील स्वत:ला वैज्ञानिक असल्याचा दावा करत आहेत. दोघंही जवळच्या दुकानात जेवण आणत होते. अलीकडेच अमेरिकेतून परतले आहेत. इतकचं नाही तर या दोघांच्या शरीरात मायक्रोचिप्स लावल्याचा दावाही करण्यात आला आहे. चौकशीदरम्यान, दोघंही अमेरिका आणि भारताच्या संबंधावर याचिका करण्यासाठी दिल्लीत आल्याचं कळालं.
हेल्मेट घालण्याची आवश्यकता का?
बाप-लेक बहुतांश वेळ कारमध्येच राहत होते. दोघंही कारच्या आतमध्ये हेल्मेट घालून बसत होते. जर हेल्मेट हटवलं तर शरीरातून वायब्रेशंस होत असे असा दावा त्यांनी पोलिसांसमोर केला आहे. पोलीस त्यांच्या या दाव्याची तपासणी करत आहेत. कारमध्ये असणाऱ्या या दोघांची ओळख ते तामिळनाडूतील असल्याचं समजलं. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांचीही मानसिक स्थिती ठीक नाही. त्यांची तपासणी केली जात आहे. दोघांनी त्यांची कार पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयाबाहेर पार्किंग क्षेत्रात उभी केली होती. या प्रकरणामुळे परिसरात बीट ऑफीसर नरसी राम यांनी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आले आहे. परंतु अद्याप या दोघांवर कुठलाही गुन्हा नोंदवण्यात आला नाही.
मानसिक आजार की टेहाळणी?
हे दोघंही मानसिक रुग्ण असल्याचं पोलीस सांगत आहेत. तरीही दोघांची मेडिकल चाचणी केली जाणार आहे. कारण इतक्या अतिसंवेदनशील परिसरात एक आठवडा कारमध्ये लपून त्यांनी सुरक्षा यंत्रणेचे धिंडवडे काढले आहेत. या दोघांच्या माध्यमातून कुठलं षडयंत्र रचलं जात नाही हेदेखील नाकारता येत नाही. पोलीस मेडिकल रिपोर्टच्या आधारे पुढील कार्यवाही करू असं सांगत आहेत.