लखनौ : सपातील राजकीय नाट्याचा दुसरा अंक पुन्हा सुरू झाला आहे. अर्थातच ठिकाण आहे दिल्ली आणि उत्तर प्रदेश. सायकल चिन्हावर दावा सांगणारे पिता-पुत्र मुलायम सिंह आणि अखिलेश यादव हे आमदार, खासदारांची शपथपत्रे जमविण्यात व्यस्त आहेत. तर, नेताजींनी (मुलायम सिंह) पुन्हा एकदा शिवपाल सिंह यादव यांना घेत दिल्ली गाठली. निवडणूक आयोगासमोर ते आपली बाजू मांडणार आहेत. सपाच्या दोन्ही गटांनी सायकल चिन्हावर दावा केल्यानंतर, आता निवडणूक आयोगाने त्यांच्याकडून दाखल दस्तऐवजांवर अभ्यास सुरू केला आहे. आपले समर्थक आमदार, खासदार यांचे हस्ताक्षरित शपथपत्र आयोगाने या गटांना मागितले आहेत. कोणत्या गटाजवळ किती संख्याबळ आहे, याची माहिती या माध्यमातून समजणार आहे. गत रविवारी झालेल्या सपाच्या वादग्रस्त राष्ट्रीय अधिवेशनात पक्षाचे २२९ पैकी २०० आमदार, मोठ्या संख्येने विधान परिषद सदस्य व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. अखिलेश यांचे निकटवर्तीय समजले जाणारे खासदार नरेश अग्रवाल यांनी असा दावा केला आहे की, पक्षाचे बहुतांश आमदार, खासदार हे अखिलेश यांच्यासोबत आहेत. अखिलेशच्या पाठी २00हून अधिक आमदार अखिलेश यांनीही आमदार, खासदारांची शपथपत्रे जमविणे सुरू केले आहे. सपाच्या २२९ पैकी २१४ आमदारांचा अखिलेश यांना पाठिंबा असल्याचा दावा त्यांच्या गटातर्फे केला आहे. अखिलेश यांचा गट शुक्रवारी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. अखिलेश यांनी आपल्या सरकारी निवासस्थानी आमदार, खासदारांशी चर्चा करून शपथपत्रावर या नेत्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. सायकल चिन्ह मिळविण्यासाठी या गटाकडूनही कुठलीही कसर सोडण्यात आलेली नाही. शंभर आमदारांनी यापूर्वीच शपथपत्रावर स्वाक्षऱ्या केल्या असल्याचेही अखिलेश यांच्या गटातील नेत्यांनी सांगितले.
सायकलसाठी पित्याने धरला हट्ट!
By admin | Published: January 06, 2017 2:26 AM