चेन्नई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्याकांडातील सहा दोषींची शनिवारी तुरुंगातून सुटका करण्यात आली. नलिनी हे यांतील सर्वांत चर्चित नाव. नलिनीने रविवारी तुरुंगातील आठवणी सांगितल्या. ती म्हणाली, ‘राजीव गांधी यांच्या कन्या प्रियंका २००८ मध्ये वेल्लोर मध्यवर्ती कारागृहात मला भेटायला आल्या होत्या. वडिलांच्या हत्येबाबत त्यांनी प्रश्न विचारला. मला जे काही माहीत होते, ते सर्व मी त्यांना सांगितले. ते ऐकून त्या रडल्या.’नलिनीला प्रियंका यांच्यासोबतच्या संभाषणाबद्दल विचारले असता तिने माहिती देण्यास नकार दिला. त्या भेटीत आणखी काय झाले, ते सांगता येणार नाही. ते प्रियंका यांचे वैयक्तिक विचार होते, असे ती म्हणाली.
मी गांधी कुटुंबाची ऋणीनलिनी म्हणाली की, मी गांधी कुटुंबाची ऋणी आहे. मला संधी मिळाली तर मी त्यांना नक्की भेटेन. मला तमिळनाडूतील काही ठिकाणांना भेट द्यायची आहे. खास करून कमला सर मेमोरियल. मला तुरुंगातून बाहेर येण्यास मदत करणाऱ्या सर्व लोकांना मला भेटायचे आहे. मला तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांना भेटायचे आहे. त्यांना भेटून मी त्यांचे आभार मानू इच्छिते. आता मी घरीच राहून माझ्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करणार आहे. माझे पती व्ही. श्रीहरन ऊर्फ मुरुगन जिथे जातील तिथे मी जाईन.
सोनिया गांधींनी नलिनीला माफ केले नलिनीला राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली, तेव्हा ती गर्भवती होती. त्यानंतर सोनिया गांधींनी नलिनीला माफ केले. नलिनीच्या चुकीची शिक्षा अद्याप जगात न आलेल्या निष्पाप बाळाला कशी दिली जाऊ शकते, असे त्या म्हणाल्या होत्या.