नवी दिल्ली: श्रीराम जन्मभूमी अयोध्येत २२ जानेवारी रोजी नव्याने बांधलेल्या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठापना झाली. या सोहळ्यात ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे मुख्य इमाम, डॉ. उमर अहमद इलियासी (Imam Umer Ahmed) यांनीही हजेरी लावली होती. व्हीव्हीआयपी पाहुण्यांमध्ये त्यांचा समावेश होता. मात्र रामललाच्या प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल इलियासी यांच्याविरोधात एक फतवा काढण्यात आला आहे.
आपल्या विरोधात जारी करण्यात आलेल्या फतव्याबाबत उमर अहमद इलियासी म्हणाले, 'मुख्य इमाम या नात्याने मला श्री रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टकडून निमंत्रण मिळाले होते. दोन दिवस विचार केल्यानंतर मी अयोध्येला जायचे ठरले. हा फतवा काल काढण्यात आला, पण मला २२ जानेवारीच्या संध्याकाळपासून धमकीचे फोन येत आहेत. मी काही कॉल रेकॉर्ड केले आहेत, ज्यात कॉल करणाऱ्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे, असं इलियासी यांनी सांगितले. माझ्यावर आणि देशावर प्रेम करणारे मला साथ देतील. मी कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे माझा द्वेष करणाऱ्यांनी पाकिस्तानात जावं. मी प्रेमाचा संदेश दिला आहे, कोणताही गुन्हा केला नाही. मी माफी मागणार नाही आणि राजीनामाही देणार नाही. धमक्या देणारे त्यांना हवं ते करू शकतात, असं आव्हान देखील इलियासी यांनी दिलं आहे.
फतव्यात नेमकं काय म्हटलंय?
इलियासी यांच्याविरोधातील फतव्यात म्हटले की, 'राम मंदिरात जाण्यापूर्वी तुम्ही मौलाना जमील इलियासी यांचे पुत्र आणि मेवातच्या एका प्रसिद्ध धर्मोपदेशक कुटुंबातील आहात, याचा विचार केला नाही का? तुम्ही कधीपासून इमामांचे प्रमुख झाला? फक्त हिंदूंना खूश करण्यासाठी तिथे गेला होतात.' एवढंच नाही तर या फतव्यात इमामांविरोधात इतर अनेक गोष्टी म्हटल्या आहेत. याशिवाय त्यांच्या इमाम असण्यावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
कोण आहे इलियासी?
डॉ. उमर अहमद इल्यासी ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशन (AIIO)चे प्रमुख आहेत. या संघटनेत ५ लाखांहून अधिक इमाम असल्याचा दावा केला जात आहे. जे २१ कोटी भारतीय मुस्लिमांचा आवाज आहेत. एआयआयओचा दावा आहे की, ही जगातील सर्वात मोठी इमाम संघटना आहे. या संस्थेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाल्याचा दावाही केला जात आहे. अलीकडेच अहमद इलियासी यांना पंजाबच्या देश भगत विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे. भारतीय इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या मशिदीच्या इमामाला एवढ्या मोठ्या पदवीने सन्मानित करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. इलियासी यांना इस्लामिक कायद्यातील तज्ञ मानले जाते. दहशतवाद आणि अतिरेकी यांवर स्पष्ट भूमिका असलेल्या काही इस्लामी विचारवंतांपैकी ते एक आहेत.
CAA-NRCवर इलियासी यांचं मत काय?
एआयआयओच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, डॉ.ओमर अहमद इलियासी यांना शांतता आणि सौहार्दासाठी देश आणि जगातील शेकडो पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) विरोधात देशात निदर्शने होत असताना, इलियासी यांनी एक निवेदन जारी केले होते की, प्रथम लोकांनी सीएए आणि एनआरसी समजून घेतले पाहिजे आणि तरीही त्यांना काही चुकीचे वाटत असेल तर त्यांनी शांततेने आंदोलन करावे. सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे किंवा कायदा हातात घेणे योग्य नाही, असं आवाहन इलियासी यांनी केलं होतं.
मोहन भागवत यांना राष्ट्रपिता म्हणून संबोधले होते-
सुमारे दीड वर्षांपूर्वी इलियासी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची भेट घेतली होती. दिल्लीतील कस्तुरबा मार्गावरील मशिदीत ही बैठक झाली. यानंतर भागवत उत्तर दिल्लीतील आझादपूर येथील मदरशामध्येही पोहोचले. तेव्हा इलियासी यांनी त्यांना 'राष्ट्रपिता' म्हटले होते. मात्र, आरएसएसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, भागवत यांनी त्यांना अडवून राष्ट्रपिता एकच आहे आणि आपण सर्व भारताची मुले आहोत, असे सांगितले. उमर अहमद इलियासी यांनी याआधीही भागवत यांची अनेकवेळा भेट घेतली होती. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत एका कार्यक्रमातही भाग घेतला होता.