ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या हल्ल्याचा बदला म्हणून भारताने सर्व स्तरावर कोंडी करुन पाकिस्तानला अद्दल घडवायचे ठरवले आहे. याच पार्श्वभूमीवर, भारतात पाकिस्तानी कलाकारांच्या काम करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. हा वाद शमलेला नसतानाच, राष्ट्रीय पुरस्कार विजेते सिनेनिर्माते श्याम बेनेगल यांनी आगामी सिनेमामध्ये पाकिस्तानी कलाकार फवाद खानसोबत काम करायचे ठरवले आहे. श्याम बेनेगल यांच्या या निर्णयामुळे पाकिस्तानी कलाकारांच्या बॉलिवूडमध्ये काम करण्यासंदर्भातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
'ये रास्ते है प्यार के' असे सिनेमाचे नाव असून, दोन्ही देशांमधील तणाव कमी झाल्यानंतर यासंदर्भात बोलणी होणार असल्याची माहिती मिळते आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन हर्ष नारायण करणार असून, फवाद यामध्ये संगीतकाराच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. एकीकडे, बॉलिवूडच्या कलाकारांनी आणि सिनेनिर्मात्यांनी पाकिस्तानी कलाकारांसोबत काम न करण्याची भूमिका स्वीकारली आहे. सोबत, सेन्सॉर बोर्डचे प्रमुख, पहलाज निहलानी यांनी देखील बॉलिवूडमध्ये पाकिस्तानी कलाकारांच्या काम करण्याला विरोध दर्शवला आहे. तर दुसरीकडे, बेनेगल यांनी फवादसोबत आगामी सिनेमा करण्याची इच्छा व्यक्त करुन, अगदी परस्परविरोधी भूमिका मांडली आहे. त्यामुळे सिनेसृष्टीत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
आणखी बातम्या