खुशखबर... यंदा मॉन्सून दहा दिवस आधीच येणार, राज्यात धाे-धाे बरसणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2022 03:57 AM2022-05-07T03:57:16+5:302022-05-07T04:01:11+5:30
केरळमध्ये मॉन्सून २० किंवा २१ मे रोजी धडकणार, त्यानंतर पुढील १० दिवसांत महाराष्ट्रात बरसणार.
नवी दिल्ली : उष्णतेच्या लाटेमुळे देशभरात नागरिकांना उन्हाचे तीव्र चटके बसत आहेत. मात्र, उन्हामुळे हैराण झालेल्या देशवासीयांसाठी दिलासादायक बातमी आहे. यावर्षी मान्सूनचे आगमन १० दिवस आधीच हाेण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. केरळमध्ये २० किंवा २१ मेपर्यंत मान्सून धडकणार असून पुढील १० ते १२ दिवसांमध्ये ताे महाराष्ट्रात दाखल हाेईल, असा अंदाज आहे.
दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळमध्ये दाखल हाेताे. यावेळी त्याचे तब्बल १० दिवस आधीच आगमन हाेण्याचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण हाेत आहे. सध्या ओडिशाच्या किनारपट्टीवर ‘आसानी’ चक्रीवादळ धडकले आहे.
याशिवाय अरबी समुद्रात येत्या काही दिवसांमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण हाेण्याची स्थिती आहे. या दाेन्हीमुळे मान्सून वेगाने पुढे सरकण्याची स्थिती निर्माण हाेईल. परिणामी मान्सूनचे आगमन लवकर हाेऊ शकते. त्यामुळे उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांना लवकर दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
युराेपियन संस्थेचा अंदाज
‘युराेपियन सेंटर फाॅर मीडियम रेंज वेदर पेव्हकास्ट’ या संस्थेच्या अंदाजानुसार, बंगालमधील चक्रीवादळामुळे अरबी समुद्रातही कमी दाबाचा पट्टा निर्माण हाेत आहे. त्याच्या प्रभावाने मान्सून वेगाने पुढे सरकू शकताे. तसे झाल्यास केरळमध्ये पाऊस १० दिवस लवकरच बरसणार आहे.
९९% पावसाचा अंदाज
हवामान खात्याने यंदा सरासरीच्या ९९ टक्के मान्सून बरसणार असल्याचा प्राथमिक अंदाज १४ एप्रिलला व्यक्त केला हाेता. पावसाची दीर्घकालीन सरासरी ८७ सेंमी आहे. ला निना परिस्थिती अनुकूल असल्यामुळे मान्सून चांगला बरसणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले हाेते.
राज्यात जाेर‘धारा’
महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश आणि राजस्थानात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
तर ईशान्येकडील राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असे हवामान खात्याने सांगितले आहे.
विषुववृत्ताजवळील एका विशिष्ट भागात ढगांची सक्रियता वाढली आहे. याचा उपखंडातील पर्जन्यमानावर परिणाम हाेत असताे. यंदा ते खूप सक्रिय असल्याने मान्सूनची वाटचाल वेगाने हाेण्याची चिन्हे आहेत. केरळमध्ये मान्सून १ जूनपर्यंत दाखल हाेईल.
आनंद कुमार दास,
तज्ज्ञ, भारतीय हवामान खाते