नवी दिल्ली - आपल्या आधीच्या घोषणेवर कायम राहून काँग्रेसने हरयाणा विधानसभा निवडणुकीत आपला एकही खासदार उभा केला नाही, परंतु अनेक नेते आणि त्यांच्या मुलांवर मेहेरबान होत त्यांना तिकीट दिले. पक्षाने ९० सदस्यीय हरयाणा विधानसभा निवडणुकीत एकूण ८९ जागांसाठी उमेदवार घोषित केले असून, माकपसाठी १ जागा सोडली आहे. आपने निवडणुकीसाठी गुरुवारी उर्वरित उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पक्षाने आपले ज्येष्ठ नेते प्रेम गर्ग यांना पंचकुलातून उमेदवारी दिली आहे.
दरम्यान, हरयाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांनी गुरुवारी राज्याची विधानसभा तात्काळ प्रभावाने बरखास्त केली. बुधवारी मंत्रिमंडळाने विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस केली होती.
मुख्यमंत्री कोण?
काँग्रेसच्या ८९ उमेदवारांमध्ये एकाही विद्यमान खासदाराचे नाव नसले तरीही राज्यातील काही खासदार मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणून समोर येत आहेत. यात कुमारी सैलजा, रणदीप सुरजेवाला आणि दीपेंद्र सिंह हुडा आघाडीवर आहेत.
भाऊ-बहीण एकमेकांच्या विरोधात
भाजपमध्ये गेलेल्या किरण चौधरी यांची मुलगी श्रुती यांच्या विरोधात त्यांचा चुलत भाऊ अनिरुद्ध हे तोशाम विधानसभेतून लढत आहे. श्रुती व अनिरुद्ध ही माजी मुख्यमंत्री बन्सीलाल यांची नातवंडे आहेत.
तिकीट कापले, आमदार ओक्साबोक्सी रडले
राज्यातील भारतीय जनता पक्षाप्रमाणेच काँग्रेसलाही तिकीट न दिल्याने काही नेत्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागत आहे. हरयाणातील काँग्रेसचे माजी आमदार ललित नागर यांना तिकीट न मिळाल्याने ते रडले आणि म्हणाले की, त्यांनी पक्ष मजबूत करण्यासाठी खूप मेहनत घेतली, पण पाठीत वार करण्यात आला. शारदा राठोड आणि जितेंद्रकुमार भारद्वाज यांनीही काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे. सोहना मतदारसंघात प्रबळ दावेदार जितेंद्र कुमार भारद्वाज हे तिकीट न मिळाल्यामुळे नाराज झाले आहेत. “माफ करा मित्रांनो, आज सेवा, समर्पण आणि निष्ठा यांचा पराभव झाला आहे’, असे ते म्हणाले.
देशातील सर्वांत श्रीमंत महिला अपक्ष
कुरुक्षेत्रातील भाजप खासदार नवीन जिंदाल यांच्या आई सावित्री जिंदाल यांनी गुरुवारी निवडणुकीसाठी हिसार मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अखेरच्या दिवशी अर्ज दाखल केला. सावित्री या हरयाणा भाजपकडून तिकिटावर दावा करत होत्या. मात्र, त्यांना तिकीट नाकारण्यात आले. त्या हिसारचे विद्यमान आमदार कमल गुप्ता यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. सावित्री जिंदाल या देशातील सर्वांत श्रीमंत महिला असून, त्यांची एकूण संपत्ती २९.१ अब्ज आहे.