देशातील महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, राजस्थानसारख्या काही राज्यांमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटचे रुग्ण सापडले आहेत. हा ओमायक्रॉन देशभर पसरू नयेत म्हणून केंद्र आणि राज्य सरकारे विविध प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर ओमायक्रॉन रुग्णांवर कसे आणि कुठे उपचार करावेत याबाबत केंद्र सरकारने राज्यांना निर्देश दिले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. ओमायक्रॉन रुग्णांवर विशेष कोविड रुग्णालयांमध्येच उपचार केले जावेत, तसेच त्यांच्यासाठी अन्य कोरोना रुग्णांपासून वेगळा विभाग असावा अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी हे पत्र लिहिले आहे. कोरोना आणि ओमायक्रॉनमुळे क्रॉस इन्फेक्शन पसरण्याची शक्यता आहे. तसेच आरोग्य कर्मचारी, अधिकारी आणि अन्य रुग्णांना या विषाणूची बाधा होऊ नये याची काळजी घेण्यात यावी, यासाठी अशा रुग्णांवर वेगळे उपचार करावेत अशी सूचना करण्यात आली आहे. जे रुग्ण परदेशातून आले आहेत व जे आमायक्रॉन बाधित झाले आहेत त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाचा स्वॅब तातडीने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवून द्यावा. परदेशातून आलेल्या प्रवाशांवर जिल्हा प्रशासनाने लक्ष ठेवावे. त्यांची वेळोवेळी चाचणी करावी. तसेच ते धोकादायक देशांतून आले आहेत का हे देखील पहावे, असे पत्रात म्हटले आहे. प्रायमरी आणि सेकंडरी कॉन्टॅक्टना त्वरीत शोधण्यात यावे असेही म्हटले आहे.