नवी दिल्ली : व्हॉट्सअॅपच्या प्रस्तावित पेमेंट सेवेचा डाटा समूहातील अन्य कंपन्या फेसबुक आणि इन्स्टाग्रामला हस्तांतरित केला जाऊ शकतो, अशी भीती भारत सरकारकडून व्यक्त करण्यात आली असून, या प्रकरणात लक्ष घालण्याचे निर्देश नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन आॅफ इंडियाला (एनपीसीआय) देण्यात आले आहेत.
व्हॉट्सअॅपप्रमाणेच गुगल पेसारख्या अन्य खाजगी पेमेंट कंपन्यांचा डाटाही अन्यत्र सामायिक होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना एनपीसीआयला सरकारकडून देण्यात आल्या आहेत, असे सूत्रांनी सांगितले. व्हॉट्सअॅपची प्रस्तावित पेमेंट सेवा ‘युनिफाइड पेमेंट इंटरफेस’वर (यूपीआय) आधारित आहे. यूपीआयद्वारे बँक खात्यावरून वास्तवकालीन निधी हस्तांतरण होते. एका अधिकाऱ्याने सांगितले की, व्हॉट्सअॅपने डाटा सुरक्षेची हमी दिलेली आहे. फेसबुक आणि बिगर-व्हॉट्सअॅप उपकंपन्या व्हॉट्सअॅपचा यूपीआय व्यवहार डाटा कोणत्याही व्यावसायिक कारणांसाठी वापरीत नाहीत, असे व्हॉट्सअॅपने सांगितले आहे.
एका वरिष्ठ अधिकाºयाने याबाबत सांगितले की, फेसबुक ही व्हॉट्सअॅपची पालक कंपनी आहे. व्हॉट्सअॅपला क्लाऊड सेवाही फेसबुक या मूळ कंपनीकडून दिली जाते. त्यामुळे डाटा हस्तांतराची भीती आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत व्हॉट्सअॅपची पेमेंट सेवा सुरू होणार आहे. डाटा सुरक्षेसाठी भारत सरकार ‘वैयक्तिक डाटा संरक्षण विधेयक’ आणत आहे. हे विधेयक लवकरच संसदेत मांडले जाणार आहे.
अधिकारी घेणार मंत्र्यांची भेटव्हॉट्सअॅपचे नवे जागतिक प्रमुख विल कॅथकार्ट हे सध्या भारत भेटीवर असून, याच आठवड्यात ते पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी आणि आयटी मंत्री रविशंकर प्रसाद यांना भेटणार आहेत. या भेटीदरम्यान डाटा सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा होऊ शकते, असे एका अधिकाºयाने सांगितले. डाटाची साठवणूक भारतातच करण्याचे धोरण भारत सरकारने यापूर्वीच आखले असून, व्हॉट्सअॅपने त्याचे पालन करण्याचे आधीच मान्य केले आहे.