नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा विळखा आणखी घट्ट होत चालला असून, कोरोना रुग्णांची एकूण संख्या दोन कोटींच्या घरात पोहोचली आहे. सोमवारी कोरोनाचे ३ लाख ६८ हजार १४७ नवे रुग्ण आढळून आले, तर ३ लाख ७३२ रुग्ण बरे झाले. या दिवशी कोरोनामुळे ३४१७ जण मरण पावले आहेत. देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या १९९२५६०४ झाली आहे, तर उपचाराधीन रुग्णांचा आकडा ३४१३६४२ आहे. आतापर्यंत १६२९३००३ जण कोरोनातून बरे झाले, तर बळींची एकूण संख्या २१८९५९ आहे. देशात बरे होणाऱ्यांचे प्रमाण ८१.७७ टक्के झाले आहे.
कोरोनाच्या या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक राज्यांमधील रुग्णालयांची क्षमता संपली असल्यानं आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर असल्याचं चित्र आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. काही ठिकाणी रुग्णालयातील परिस्थिती विदारक आहे. रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मध्य प्रदेशच्या छिंदवाडा रुग्णालयातही असाच एक प्रकार घडला होता. रुग्णालयातील एका रुग्णाचा व्हिडीओ काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
एक कोरोनाबाधित रुग्ण या व्हिडिओमध्ये ''कोरोना से नही सहाब पंखे से डर लगता है'' म्हणत वर फिरणारा पंखा दाखवतो. सिलिंगला लटकणारा हा पंखा अगदी सिलिंगला जोडलेल्या दांड्यापासून फिरतोय. त्यामुळेच हा पंखा पडेल की काय अशी भीती या रुग्णाला असल्याचे तो व्हिडीओत सांगतो. यासंदर्भात मी डॉक्टरांकडे आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांकडे अनेकदा तक्रार केलीय. पण हा पंखा नीट करण्यात आलेला नाही असं हा रुग्ण सांगतोय. त्याचप्रमाणे या पंख्यामुळे मला रात्रभर झोप येत नसल्याचंही तो व्हिडिद्वारे सांगताना दिसत आहे.
सदर व्हिडिओ मोठ्या प्रमाणात देशभरात व्हायरल झाला. त्यामुळे याची दखल घेत मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी घेतली. आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून एका टेक्निशियनला घेवून तो पंखा दुरुस्त करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे एका तरुणाचा सोशल मीडियामुळे जीव वाचला असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, मध्य प्रदेशच्या छिंदवाडामधील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णानं त्याची समस्या व्हिडीओच्या माध्यमातून मांडली होती. या व्हिडीओत तरुण रुग्ण वॉर्डमध्ये असलेल्या एका पंख्याची तक्रार करताना दिसत आहे. कोरोना से डर नहीं लगता साहब, फॅन से लगता है, अशी दबंग स्टाईल तक्रार या तरुणानं व्हिडीओमध्ये केली आहे. या तरुणाच्या डोक्यावर असलेला पंखा एखाद्या भोवऱ्यासारखा फिरताना दिसत आहे. हा पंखा लवकरात लवकर बदलण्यात यावा, अशी मागणी केली होती. या रुग्णानं रेकॉर्ड केलेला व्हिडीओ २ मिनिटं १८ सेकंदांचा आहे. यामध्ये रुग्णांनी भरलेला वॉर्ड दिसत आहे. त्यानंतर तरुणानं व्हिडीओमध्ये त्याच्या डोक्यावर असलेला पंखा दाखवला आहे. हा पंखा एका जागी न राहता तो एखाद्या भोवऱ्यासारखा फिरताना दिसत आहे. हा पंखा कधीही खाली पडेल अशा स्थितीत आहे. कोरोनाची भीती नंतर, मला त्याआधी या पंख्याची भीती वाटते. कोरोनाच्या आधी हा पंखाच माझा जीव घेईल, असं वाटतं, अशी व्यथा या तरुणानं मांडली होती.