रोस्टर घोटाळ्याची कागदपत्रे गहाळ होण्याची भीती
By admin | Published: June 25, 2015 11:51 PM
हायकोर्ट : विद्यापीठाला मागितले प्रतिज्ञापत्र
हायकोर्ट : विद्यापीठाला मागितले प्रतिज्ञापत्रनागपूर : डॉ. पूरण मेश्राम यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलसचिवपदी नियुक्ती करण्यात आल्यामुळे रोस्टर घोटाळ्याची कागदपत्रे गहाळ होण्याची शक्यता आहे, अशी भीती प्रा. सुनील मिश्रा यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात त्यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पुर्सिस सादर केले.महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठाचा संपूर्ण रेकॉर्ड कुलसचिवांच्या ताब्यात असतो. पूर्वानुभव पाहता रोस्टर घोटाळ्याची कागदपत्रे मेश्राम यांच्याकडे सुरक्षित राहणार नाहीत, याकडे मिश्रा यांनी लक्ष वेधले आहे. मिश्रा यांनी २४ मे रोजी कुलगुरूंना ई-मेल पाठवून रोस्टर घोटाळ्याची कागदपत्रे स्वत:च्या ताब्यात घेण्याची विनंती केली आहे. असाच ई-मेल कुलपतींना पाठविण्यात आला होता. १६ जून रोजी कुलपती कार्यालयाने कुलगुरूंना पत्र लिहून आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.रोस्टर घोटाळ्यातील आरोपींवर कारवाई करण्यासाठी मिश्रा यांनी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या याचिकेवर गुरुवारी न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व प्रदीप देशमुख यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, मिश्रा यांनी पुर्सिस सादर करून घोटाळ्यासंदर्भातील कागदपत्रांच्या सुरक्षिततेवर चिंता व्यक्त केली. यानंतर न्यायालयाने नागपूर विद्यापीठाला पुर्सिसवर उत्तर सादर करण्याचे निर्देश देऊन पुढील सुनावणी ८ जुलै रोजी निश्चित केली.