आंध्र प्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोना संसर्गाच्या भीतीने एक महिला आणि तिच्या मुलीने गेल्या अडीच वर्षांपासून स्वतःला घरातील एका छोट्या खोलीत कोंडून घेतले होते. या दरम्यान त्या ना कोणाला भेटायच्या ना घराबाहेर पडायच्या. जिल्ह्यातील कुइयेरू गावातील हे प्रकरण असून, आता या माय-लेकीला बाहेर काढण्यात आले आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याच्या भीतीने दोघांनीही गेल्या अडीच वर्षांपासून स्वत:ला एका खोलीत कोंडून घेतले होते. गेली अडीच वर्षे त्या कोणालाही भेटल्या नाहीत, त्यांनी सूर्यप्रकाशदेखील पाहिला नाही. महिलेच्या पतीने सांगितले की, हे सर्व कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळात सुरू झाले. कोविडमुळे होणाऱ्या मृत्यूची बातमी ऐकून दोघींनी स्वतःला खोलीत कोंडून घेतले होते.
महिलेने पती सुरी बाबूलाही भेटण्यास नकार दिला होता. तो बाहेरून रेशन, भाजीपाला वगैरे आणून द्यायचा. ही बातमी आजूबाजूच्या लोकांमधून कोणीतरी पोलीस आणि मीडियापर्यंत पोहोचवली. यानंतर पोलीस व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी मिळून खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि मायलेकीला बाहेर काढले.
दोघींनाही काकीनाडा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, डॉक्टरांनी दोघींची मानसिक व शारीरिक स्थिती तपासली. यामध्ये दोघींचीही शारीरिक स्थिती स्थिर असली तरी त्यांची मानसिक स्थिती समजून घेण्यासाठी त्यांना मानसोपचार तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.