नवी दिल्ली :
अंतराळातील शस्त्रास्त्रीकरणाच्या स्पर्धेमुळे अवकाशात युद्धाची भीती निर्माण झाली आहे, असा इशारा संरक्षण दल प्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चव्हाण यांनी दिला आहे. सीडीएस चौहान यांनी मंगळवारी भारतीय संरक्षण दलावरील एका चर्चासत्राचे उदघाटन केले. या वेळी ते म्हणाले की, अंतराळ क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यावर तसेच विकासावर विशेष भर देणे गरजेचे झाले आहे. ‘‘अंतराळ हे एक क्षेत्र आहे जे जमीन, समुद्र, हवा आणि अगदी सायबरसह इतर क्षेत्रांमध्ये क्षमता वाढवत आहे. अंतराळाचा लष्करी वापर हा एक महत्त्वाचा चर्चेचा विषय आहे ज्यापासून आपण दूर राहू शकत नाही,’’ असेही चव्हाण म्हणाले. अत्याधुनिक तंत्रज्ञान आवश्यक- ‘‘रशिया आणि चीनच्या उपग्रहविरोधी चाचण्यांचा संदर्भ देत भारताने अंतराळ क्षेत्रात आक्षेपार्ह आणि बचावात्मक क्षमता निर्माण करण्याच्या गरजेवर भर दिला. सध्याची आणि भविष्यातील आव्हाने पाहता भारताने आपले प्रयत्न अधिक व्यापक करण्याची गरज आहे. आपण सर्वांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करून दुहेरी-वापराचे व्यासपीठ विकसित करण्याचे ध्येय ठेवले पाहिजे,’’ असेही ते म्हणाले.