नवी दिल्ली : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी घातलेले निर्बंध व लॉकडाऊन उठवणे सुरु करताच सर्व शहरे, बाजारपेठा आणि पर्यटन स्थळी प्रचंड गर्दी दिसू लागली आहे. लोक मास्क न घालताच सर्वत्र फिरत आहेत. त्यामुळे दुसरी लाट ओसरण्याआधीच कोरोनाची तिसरी लाट येते की काय, अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मंत्र्यांच्या बैठकीत आणि शुक्रवारी ऑक्सिजन प्रकल्पांचा आढावा घेताना लोक मास्क न वापरता ज्या पद्धतीने गर्दी करीत आहेत, याविषयी चिंता व्यक्त केली. आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनीही पर्यटन स्थळी कुटुंब व लहान मुलांसह होत असलेल्या गर्दीमुळे पुन्हा रुग्ण वाढण्याचा अप्रत्यक्ष इशारा दिला. निर्बंध उठवताना खूप सावधगिरी बाळगावी, अशा सूचना सर्व राज्यांना दिला आहे. लोक जर पाळणार नसतील तर निर्बंध कायम राहतील. त्याचा मोठा आर्थिक फटका देशाला बसेल. अर्थव्यवस्था रुळावर आणताना खबरदारी घ्यावी लागेल, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
लाम्बडा विषाणू भारतात नाही - देशात कोरोनाच्या लाम्बडा या विषाणूचा एकही रुग्ण अद्याप आढळलेला नाही असे केंद्राने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात आरोग्य खात्याच्या अधिकाºयांनी सांगितले की, लाम्बडा विषाणू जगातील तीस देशांमध्ये पसरला आहे. त्यात भारताचा समावेश नाही. - पेरू या देशातून लाम्बडा विषाणूचा उगम झाला. त्या देशामध्ये दर एक लाख लोकांमागे ५८७ लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. लाम्बडा विषाणूच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेनेही नुकतेच जाहीर केले होते. कोरोनाच्या मूळ विषाणूपेक्षा लाम्बडाचा संसर्ग अधिक वेगाने पसरतो.
इतर आजारांचा धोका- रोजची कोरोना रुग्णांची संख्या अद्याप ४५ हजारांच्या घरातच आहे. ती अजूनही कमी होताना दिसत नाही. त्यातच देशभर म्युकरमायकोसिस, डेल्टा प्लस, कप्पा याचे रुग्ण आढळू लागले आहेत. - कोरोनाचेही सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र व केरळात आहेत. खबरदारी न घेतल्यास तिसऱ्या लाटेचा सामना करणे अवघड होईल. आरोग्य यंत्रणा व अर्थव्यवस्थेवर येईल, अशी भीती सरकारला वाटत आहे. - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठीऔषधे, उपकरणे, वाढीव वैद्यकीय कर्मचारी, नवे ऑक्सिजन प्रकल्प आणि असलेल्यांच्या क्षमतेत वाढ हे सारे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
केरळ : ‘झिका’चे १४ रुग्ण केरळमध्ये झिका विषाणूच्या संसर्गाचे १४ रुग्ण आढळले आहेत. हा विषाणू डासाच्या माध्यमातून माणसांमध्ये संक्रमित होतो. केरळमध्ये याची लागण सर्वप्रथम एका गर्भवती महिलेला झाली. त्यानंतर १३ रुग्ण तिथे सापडले. या विषाणूच्या संसर्गाची लक्षणे डेंग्यूसारखीच असतात.