नवी दिल्ली - भाजपाकडून लोकसभा निवडणूक 2019 साठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. केंद्रातील भाजपा सरकारच्या आक्रमक प्रचार रणनीतीचा सामना करण्यासाठी विरोक्षी पक्षांनीही आपली कंबर कसल्याच दिसत आहे. भाजपाविरोधात विरोधकांची मोट बांधण्यासाठी आता काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पुढाकार घेतल्याचे दिसत आहे. कारण गुरुवारी (1 फेब्रुवारी) सोनिया गांधी यांनी नवी दिल्ली येथे विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. शिवाय 9 फेब्रुवारीला सोनियांनी नेत्यांसाठी डिनरचंही आयोजन केलं आहे.
काँग्रेसच्या संसदीय मंडळातील नेत्यांनी मोदी सरकारविरोधात समविचारी पक्षांना एकत्र आणण्याच्या उद्देशानं वेगवेगळ्या पक्षांसोबत बैठक घेतली. 1 फेब्रुवारीला होणा-या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारदेखील असणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 फेब्रुवारीच्या बैठकीत प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीदेखील सहभागी व्हावं, यासाठी काँग्रेसनं ममता बॅनर्जी यांना संपर्क साधून त्यांच्याकडे बैठकीसाठी वेळ मागितली आहे. पण ममता बॅनर्जी यांनी बैठकीत सहभागी होणं अशक्य असल्याचे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. मात्र बॅनर्जींऐवजी पार्टीचे नेता डेरेक-ओ-ब्रायन आणि सुदीप बंदोपाध्याय बैठकीत उपस्थित राहतील.
दोनच दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी विरोधी पक्षांच्या नेत्यांची चर्चा झाली. मात्र या बैठकीला बहुजन समाज पक्ष, समाजवादी पार्टीचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते. दरम्यान, 2017 मध्ये राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत मीरा कुमार यांना समर्थन देण्याबाबत आणि गुजरात निवडणुकीतील काँग्रेसच्या चांगल्या कामगिरीनंतर ममता बॅनर्जी यांचा काँग्रेसकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलल्याचं दिसत आहे.