ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज रविवारी ‘मन की बात’मधून देशातील जनतेशी संवाद साधला. देशाला संबोधित करण्याचा हा त्यांचा 29 वा कार्यक्रम होता. यावेळी त्यांनी अनेक मुद्दे मांडले.
‘इस्त्रो’च्या शास्त्रज्ञांचं त्यांनी कौतूक केलं, भारताच्या शास्त्रज्ञांचा अभिमान वाटतो, 15 फेब्रुवारी भारतासाठी ऐतिसाहीक दिवस ठरला असं गौरवोद्गार त्यांनी काढलं. जगासमोर भारताची मान उंचावेल असं काम शास्त्रज्ञांनी केलं आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाची सर्व क्षेत्रात गरज आहे असं मोदी म्हणाले. याशिवाय विश्वचषक विजेत्या भारतीय अंध संघाचंही मोदींनी कौतूक केलं.
15 फेब्रुवारीला श्रीहरिकोटा येथून एकाच प्रक्षेपकातून तब्बल 104 उपग्रह पाठविण्याचा विश्वविक्रम भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) केला होता. एकाच प्रक्षेपकाद्वारे एवढे उपग्रह पाठविणारा भारत हा जगातील पहिलाच देश बनला.
याशिवाय, डिजिटल पेमेंट करण्याकडे नागरिकांचा कल वाढतोय, डिजी धन आणि लकी ग्राहक योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. 10 लाखांहून अधिक लोकांना या योजनेंतर्गत बक्षिसे मिळाली असं मोदी म्हणाले. गावांतून शहरांना ताकद मिळते, देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचे मोठे योगदान असल्याचं ते म्हणाले.