नवी दिल्ली : सतत बदली होत असल्याने आपले आवडते वाहन बदलीच्या ठिकाणी मिरवावे लागणाऱ्या वाहनधारकांना दिलासा देणारा निर्णय केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने घेतला आहे. वाहन नोंदणी करण्यासाठी मंत्रालयाने भारत (बीएच) ही नवीन मालिका सादर केली असून, याअंतर्गत नोंदणी केलेल्या वाहनधारकांना त्यांचे वाहन देशात कुठेही आणि कधीही बिनधास्तपणे नेता येणार आहे.
लष्कर तसेच केंद्र सरकारच्या सेवेत असलेले कर्मचारी, देशभरात शाखा असलेल्या बड्या खासगी कंपन्या तसेच बँकांचे कर्मचारी यांना अनेकदा बदलीमुळे देशभर फिरावे लागते. अशावेळी त्यांना त्यांचे वाहन बदलीच्या ठिकाणी नेण्यासाठी अनेक नियम-अडचणींना सामोरे जावे लागते. हे सर्व टाळण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ‘बीएच’ ही मालिका सादर केली आहे.
काय आहे या योजनेत?
आतापर्यंत वाहन क्रमांकाच्या आधी राज्याचा काेड असायचा. त्याऐवजी आता ‘बीएच’ हा काेड असेल. भारत सीरिजच्या वाहनांचे क्रमांक YY BH 1234 XX अशा पद्धतीचे असेल.
भारत सीरिज ही लष्करातील कर्मचारी, केंद्र-राज्य सरकारमधील कर्मचारी आणि अनेक राज्यांमध्ये कार्यालये असलेल्या खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना ऐच्छिक असेल. या सुविधेअंतर्गत नोंदणी झालेल्या वाहनांचे मोटार वाहन शुल्क दोन वर्षे किंवा दोनच्या पटीतील वर्षांकरिता आकारले जाईल. खासगी वाहनांना भारतातील कोणत्याही राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात वाहन नेण्याची सोय झाली आहे. त्यासाठी संबंधित राज्यात नव्याने नाेंदणी करण्याची गरज राहणार नाही.
सध्याचा नियम काय?
सध्याच्या नियमांनुसार दुसऱ्या राज्यात वाहन न्यायचे असल्यास संबंधित राज्यात १२ महिन्यांच्या आत नाेंदणी करावी लागते.मूळ राज्यातून ‘एनओसी’ न्यावी लागते. तसेच नवीन राज्यात प्राेराटा बेसिसवर माेटार वाहन शुल्क भरावे लागते.प्रत्येक बदलीच्या वेळी संबंधित राज्याचे शुल्क भरावे लागते.
हे लक्षात असू द्या...
केवळ नव्या वाहनांसाठीच हा पर्याय उपलब्ध राहणार आहे.nचार किंवा अधिक राज्यांमध्ये कार्यालये असलेल्या खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना याेजनेचा लाभ मिळेल.