ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३१ - स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु राधे माँ यांनी वैष्णोदेवीच्या कोट्यावधी भक्तांच्या भावना दुखावल्याचा दावा करत अमेरिकेतील भारतीय वंशाच्या पोलिस अधिका-याने राधे माँ यांच्याकडे १०१ मिलीयन डॉलर्सच्या ( भारतीय चलनानुसार ६६८ कोटी रुपये) नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
एका हिंदी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकेत पोलिस अधिकारी म्हणून काम करणारे ओमदेव वर्मा हे वैष्णोदेवीचे भक्त आहेत. ड्यूटीवर जातानाही वर्मा यांच्या पाकिटामध्ये वैष्णोदेवीचे फोटो असते. काही दिवसांपूर्वी पेट्रोलिंग करत असताना एका सहकार्याने ओमदेव वर्मा यांना इंग्रजी वृत्तपत्रातील राधे माँ यांचे छायाचित्र दाखवले व याच तुमच्या देवी आहेत का असा सवाल विचारला. राधे माँ यांचे छायाचित्र बघून वर्मा चक्रावून गेले. घरी परतल्यावर त्यांनी भारतीय वृत्तपत्रांमधून राधे माँ यांच्याविषयीची माहिती घेतली. राधे माँचे प्रताप बघून वर्मा यांच्या भावना दुखावल्या. धार्मिक भावनांचा खेळ करत राधे माँने कोट्यावधीची संपत्ती गोळा केली, पण यामुळे आगामी पिढीचा वैष्णोदेवीवरील विश्वास कमी होईल असा त्यांचा दावा आहे. ओमदेव वर्मा यांनी दिल्लीतील एका वकिलाच्या मार्फत राधे माँ यांना नुकसान भरपाईची नोटीस बजावली आहे.