ऑनलाइन लोकमत
चंदीगड, दि. १ - चालत्या बसमध्ये छेडछाड करणा-या तीन तरूणांची धुलाई करत त्यांना चांगलाच धडा शिकवणा-या हरियाणातील त्या दोन बहिणींचा हरियाणा सरकारतर्फे २६ जानेवारी रोजी सत्कार करण्यात येणार आहे. प्रजासत्तार दिनी या दोन्ही शूर बहिणींचा मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या हस्ते सत्कार होणार असून तयांना रोख रक्कमही देण्यात येणार आहे. दरम्यान त्या दोघींची छेड काढणा-या तिघा तरूणांना ६ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. तसेच ही घटना ज्या बसमध्ये घडली त्या बसचा ड्रायव्हर आणि कंडक्टरलाही निलंबित करण्यात आले आहे.
रोहतकमधील कॉलेजमध्ये शिकणा-या दोन सख्ख्या बहिणी परीक्षा दिल्यानंतर बसमधून आपल्या घरी जात असताना बसमधील तीन तरूणांनी त्यांची छेड काढायला सुरूवात केली. या प्रकारामुळे संतप्त झाल्यामुळे एका तरूणीने सरळ त्यांना पट्ट्याने झोडपून काढायला सुरूवात केली. यावेळी बसमधील प्रवासी फक्त बघ्याच्या भूमिकेत होते, पण कोणही त्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावले नाही. त्या तरूणाने त्यांना प्रतिकार करण्यास सुरूवात केल्यावर दुस-या बहिणीनेही त्या तिघांना बेदम चोप द्यायला सुरूवात केली. हा सर्व प्रकार बसमधील एका महिलेने कॅमे-यात रेकॉर्ड केला. त्या आधारे हरियाणा पोलिसांनी त्या तिन्ही तरूणांना अटक केली असून कुलदीप, मोहित व दीपक अशी त्यांची नावे आहेत.
दरम्यान या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेत हरियाणा सरकारने पोलिस महासंचालकांना महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. तसेच बसमध्ये असा प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी अशी सूचना बस ड्रायव्हर आणि कंडक्टरना देण्यात आली आहे.