नवी दिल्ली - काळ आला होता पण वेळ आली नव्हती, अशी म्हण प्रचलित आहे. नुकताच दिल्लीमध्ये घडलेल्या एका घटनेमधून तिचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. दक्षिण दिल्लीमध्ये पावसामुळे घसरून एक व्यक्ती चौथ्या मजल्यावरून खाली पडली. मात्र जमिनीवर आदळण्यापूर्वीच त्या व्यक्तीचा पाय ग्राऊंड फ्लोअरवर असलेल्या ग्रीलमध्ये अडकला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मालवीयनगर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या व्यक्तीची सुटका करून त्याला रुग्णालयात दाखल केले.
पोलीस अधिकारी अतुल ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ जुलै रोजी एक व्यक्ती चौथ्या मजल्यावरून खाली पडल्याची सूचना पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिथे एक व्यक्ती चौथ्या मजल्यावरून पडून तिचा पाय ग्रीलमध्ये अडकल्याचे सब इंस्पेक्टर किशन सैनी आणि कॉन्स्टेबल शीशराम यांच्या निदर्शनास आले.
यादरम्यान ही व्यक्ती उटली लटकलेली होती. तसेच ग्रीलचा टोकदार भाग त्याच्या पायात घुसलेला होता. त्यानंतर पोलिसांनी त्वरित वेल्डरला बोलावले आणि कटरने ग्रिल कापून या व्यक्तीची सुटका केली. तसेच त्याल रुग्णालयात दाखल केले. जीवघेण्या दुर्घटनेतून बालंबाल बचावलेल्या या व्यक्तीचं नाव किशन कुमार आहे.
पोलिसांनी सांगितले की, किशन कुमार हे चौथ्या मजल्यावर माती तपासण्यासाठी गेले होते. तेवढ्यात त्यांचा पाय घसरला आणि ते खाली पडले. मात्र ग्रिलमध्ये पाय अडकल्याने बचावले. लॉकडाऊनपूर्वी किशन हे गुरुग्राममधील एका पार्लरमध्ये काम करत होते. लॉकडाऊननंतर ते दिल्लीत आले होते. दरम्यान, ते सध्या दिल्लीतील रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे.