३४ वर्षीय अनुराग मालू याला गिर्यारोहणाचा छंद आहे. ६ यशस्वी मोहिमांनंतर अनुरागने जगातील दहावं सर्वात मोठं शिखर असलेले नेपाळमधील अन्नपूर्णा पर्वतशिखर सर करण्याची योजना आखली. ८ हजार मीटर उंच पर्वतशिखर सर करण्यासाठी २ हजार मीटर अंतर बाकी होते. अनुराग हे ६ हजार मीटर उंचीपर्यंत पोहोचले होते. तिथे त्यांचा हात एका चुकीच्या दोरीवर पडला आणि ते तिथून २७० फूट खोल दरीत पडले.
अनुराग यांचे सहकारी तीन दिवस त्यांचा शोध घेत होते. तेवढा काळ ते बर्फामध्ये अडकून पडले होते. अनुराग यांच्यासमोर मृत्यू उभा होता. मात्र त्यांनी धीर सोडला नाही. त्यांनी वाचण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले. त्यादरम्यान, अनुराग यांचा कॅमेरा त्यांची स्थिती चित्रित करत होता. मात्र अनुराग यांना त्या व्हिडीओशिवाय काहीही आठवत नाही आहे.
तीन दिवसांनंतर दोन पोलिश गिर्यारोहकांनी अनुराग यांना वाचवले आणि नेपाळमधील एका रुग्णालयात दाखल केले. अनुराग यांना तीन ते चार तास सातत्याने सीपीआर दिला गेला. कारण जेव्हा ते पहिल्यांदा रुग्णालयात पोहोचले तेव्हा त्यांच्या हृदयाची धडधड थांबली होती. १० दिवस नेपाळमध्ये उपचार केल्यानंतर तेथील डॉक्टरांनी दिल्लीतील एम्स ट्रॉमा सेंटरमधील डॉक्टरांशी संपर्क साधला.
अनुराग यांची प्रकृती पाहून ते उपचार घेण्यासाठी नेपाळून दिल्लीला पोहोचतील का, याबाबत डॉक्टरांना शंका वाटत होती. मात्र तरीही एअरलिफ्ट करून त्यांना दिल्लीत आणण्यात आल. तब्बल १७४ दिवस उपचार चालले. तसेच ६ सर्जरी केल्यानंतर अनुराग हे पूर्णपणे फिट झाले. त्यानंतर ३१ ऑक्टोबर २०३ रोजी त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले.