नवी दिल्ली : अल्पवयीनांवर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती असूनही ती लपवून ठेवणे, त्याविषयी तक्रार दाखल न करणे हा गंभीर गुन्हा आहे. असे कृत्य म्हणजे आरोपीला वाचविण्यासाठी प्रयत्न केला असे मानण्यात येईल, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला.
एका वसतिगृहामध्ये अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार होत असल्याचे माहिती असूनही एका डॉक्टरने ती गोष्ट संबंधित यंत्रणांना कळविली नव्हती. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बाजूला ठेवला.चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा येथे एका वसतिगृहात १७ मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारांच्या प्रकरणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात महाराष्ट्र सरकारने दाखल केलेल्या अपिलावर सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला.