नवी दिल्ली : एखादा उच्च पदस्थ अधिकारी म्हटले, त्यांचा तामझाम, लवाजमा, नोकर- चाकर, आलिशान गाडी असे आपल्याला पाहायची सवय झाली आहे. पण, उच्च विचारसरणी आणि साधे राहणीमान कसे असावे, हे भारतात राहणाऱ्या चार अमेरिकन महिला अधिकाऱ्यांनी दाखवून दिले आहे. दरम्यान, सध्या दिल्लीतील चार अमेरिकन महिला अधिकाऱ्यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दिल्लीमध्ये असलेल्या अमेरिकन राजदूत कार्यालयातील चार डिप्लोमॅट्स (American Diplomat) या स्वतःच्या बुलेटप्रूफ गाड्या सोडून रिक्षाने प्रवास करतात. या महिला रिक्षा चालवत ऑफिसला जातात, रिक्षावरून दिल्लीत फिरतात आणि लोकांसोबत संवाद साधतात. अगदी सामान्य रिक्षाड्रॉयव्हरने या महिला वागत आहेत. एन. एल. मेसन, रुथ होल्म्बर्ग, जेनिफर बायवाटर्स आणि शरीन जे. किटरमॅन या चार महिला अमेरिकन डिप्लोमॅट्स म्हणून भारतात काम करतात. यातील शरीन जे. किटरमॅन या भारतीय वंशाच्या आहेत, त्यांचा जन्म कर्नाटकातला असून सध्या त्या अमेरिकन नागरिक आहेत. तर बाकी तीन महिला या मूळच्या अमेरिकन आहेत.
दरम्यान, एन. एल. मेसन म्हणाल्या की, "मी कधीही क्लचच्या गाड्या चालवल्या नव्हत्या. मी नेहमी ऑटोमेटिक कारच चालवते. मात्र भारतात रिक्षा चालवणे हा अनुभव होता. मी पाकिस्तानात होते तेव्हा बुलेटप्रुफ गाडीतून फिरायचे. त्यातूनच ऑफिसमध्ये जायचे. मात्र जेव्हा मी रिक्षा बघायचे तेव्हा एकदा तरी ती चालवावी असे वाटायचे. यामुळेच मी भारतात आल्यावर रिक्षाच विकत घेतली आणि आता त्यातून प्रवास करते."
मेक्सिकन राजदूतांकडून प्रेरणाभारतीय वंशाच्या शरीन जे. किटरमॅन यांच्याकडे सर्वात अनोखी गुलाबी रिक्षा आहे. जेव्हा शरीन जे. किटरमॅन कामानिमित्त दिल्लीत रुजू झाल्या, तेव्हा त्यांना समजले की, 10 वर्षांपूर्वी एक मेक्सिकन राजदूत मेल्बा प्रिया यांच्याकडे एक रिक्षा होती. त्या नेहमी रिक्षानेच प्रवास करत होत्या. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन शरीन जे. किटरमॅन यांनी रिक्षातून प्रवास करण्याचा निर्णय घेतला.